पुणे

Pune : एका बाजूला चकाचक रस्ता, तर दुसरीकडे खड्डेच खड्डे

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड, राजगड, तोरणा गडकोटांसह वेल्हे व हवेली तालुके जवळच्या अंतराने जोडणार्‍या खानापूर मार्गे रांजणे-पाबे घाट रस्त्याची दुरवस्था झाली आहे. एका बाजूला चकाचक डांबरी रस्ता, तर दुसर्‍या बाजूला धोकादायक घाट रस्त्यावर खड्डेच खड्डे, कोसळणार्‍या दरडी अशी दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहेत. खड्डे बुजवून घाट रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ व नागरिकांनी दिला आहे. हायब्रीड अ‍ॅम्युनिटी प्रकल्पाच्या योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून घाट रस्त्याचे काम सुरू आहे. खानापूरपासून पाबेपर्यंत डोंगरांतील रस्ता वनखात्याच्या हद्दीत आहे. वनखात्याच्या हरकतीमुळे अरुंद रस्त्याचे, धोकादायक वळणांवर पुरेसे रुंदीकरण करण्यात आलेले नाही.

संबंधित बातम्या :

त्यामुळे बहुतेक ठिकाणी एकाच वेळी वाहनांना समोरासमोरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. घाट रस्त्याच्या माथ्याच्या दोन्ही बाजूंच्या तीव्र चढ-उतारावर अरुंद रस्ता आहे. चढ-उतारावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची चाळण आहे. खड्ड्यांत वाहने घसरून थेट खोल दरीत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. पर्यटकांसह नागरिकांची वर्दळ अलीकडच्या काळात वाढली आहे. घाट रस्ता अरुंद असल्याने अद्यापि रांजणे-पाबे घाटातून एसटी बस सेवा सुरू झाली नाही. खानापूर ते रांजणेपर्यंत रस्ते चकाचक डांबरी केले आहेत. मात्र, मुख्य घाट रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. खड्ड्यांतून ये-जा करताना विद्यार्थ्यांसह कामगार, शेतकर्‍यांना जीव मुठीत धरावा लागत आहे.

 

राजगड, तोरणा भागात जाणार्‍या पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. धोकादायक ठिकाणीच घाट रस्त्याची चाळण झाली. वारंवार मागण्या विनंत्या करूनही बांधकाम विभाग दखल घेत नाही.
                  – किसनराव जोरी, माजी उपसभापती, हवेली तालुका पंचायत समिती

ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्याची तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे. रांजणे ते पाबे या मुख्य घाट रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत.
        – आर. वाय. पाटील, कार्यकारी अभियंता, हायब—ीड अ‍ॅम्युनिटी प्रकल्प.

SCROLL FOR NEXT