पुणे

पार्किंग नसल्याने मेट्रो प्रवासाला ब्रेक?

अमृता चौगुले

पिंपरी : महापालिकेने पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या विविध 11 जागा भाडे तत्त्वावर दिल्या आहेत. मेट्रो सुरू होऊन दीड वर्षे झाले तरी, अद्याप दोनच ठिकाणी महामेट्रोने पार्किंग व्यवस्था केली आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणार्‍यांना आपली वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ती पदपथ, रस्ते व इतर ठिकाणी लावावी लागत आहेत. पुरेसे पार्किंग नसल्याने मेट्रोने प्रवासाला ब्रेक निर्माण होत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व्हावी, म्हणून महापालिकेने महत्त्वाच्या जागा महामेट्रोला दिल्या आहेत. मेट्रो 6 मार्च 2022 ला सुरू झाली. मात्र, शहरात केवळ दोन ठिकाणी पार्किंग विकसित झाली आहे.

स्वत:च दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन प्रवाशांसाठी आल्यानंतर वाहन कोठे लावायचे, असा प्रश्न नागरिकांना पडतो. पदपथ, रस्त्याकडेला जागा शोधून वाहन लावावे लागते. मात्र, त्या ठिकाणी सुरक्षितता नसल्याने नागरिकांमध्ये धाकधूक कायम असते. जागाच उपलब्ध होत नसल्याने अनेक जण नाईलाजास्तव थेट रस्त्यावर वाहने लावतात. रस्ता अरुंद होऊन वाहतूक रहदारी मंदावते. त्यामुळे मेट्रो वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहे की, कोंडी करण्यास? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मेट्रोचे पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण
मेट्रोने पदपथ व रस्त्यावर अतिक्रमण करीत स्टेशनची उभारणी केली आहे. स्टेशनवर वाहने थांबण्यासाठी तेथील पदपथ थेट सेवा रस्त्याला जोडले आहेत. स्टेशनखाली अधिक रुंद पदपथ केल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. स्टेशनच्या ठिकाणी रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. तसेच, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

संपूर्ण शहरात मेट्रोची कनेक्टिव्ही नसल्याने गैरसोय
शहरात पिंपरी ते दापोडी केवळ 7.50 किलोमीटर अंतर मेट्रो धावते. संपूर्ण शहरात मेट्रो तसेच, पीएमपीएल बसची कनेक्टिव्ही नसल्याने सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येत नाही. शहरातील चिंचवड, आकुर्डी, निगडी, तळवडे, चिखली, रूपीनगर, भोसरी, दिघी, बोपखेल, मोशी, चर्होली, डुडुळगाव, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पुनावळे, रावेत, किवळे या बहुतांश भागांतील नागरिकांना स्वत:चे वाहन घेऊन मेट्रो स्टेशनवर जावे लागते. तसेच, पीएमपीएल बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. मेट्रो प्रवासापेक्षा या प्रवासाचा खर्च अधिक होत आहे. असे करूनही स्टेशनवर गेले तरी स्वत:चे वाहन लावण्यास जागा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

शहरात आहेत सहा मेट्रो स्टेशन
शहरात पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी हे सहा मेट्रो स्टेशन आहेत. स्टेशन खाली पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. केवळ पदपथ आहेत. मात्र, वाहन लावण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. चारचाकी वाहने लावताना नाकीनऊ येते.

गरजेनुसार पार्किंग व्यवस्था वाढविण्याचे नियोजन
महापालिका व महामेट्रो असे संयुक्तपणे पार्किंग विकसित करण्यात येणार आहे. वल्लभनगर व फुगेवाडी येथे पार्किंग केली आहे. शक्य आहे, तेथे पार्किंग सुरू केली जाईल. त्यासाठी खासगी जागा घेण्याचा विचार आहे. नागरिकांनी स्वत:ची वाहने आणू नये, म्हणून पीएमपीएलची फिडर सेवा सुरू करण्यात येणार आहे. वायसीएम रुग्णालय ते संत तुकारामनगर स्टेशन या मार्गावर फिडर सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. प्रतिसादानुसार प्रत्येक स्टेशनला फिडर सेवा सुरू केली जाईल. तसेच, शेअर रिक्षांचाही पर्याय आहे. स्टेशनजवळ सायकलची संख्याही वाढविण्यात येणार आहे. नागरिकांनी घरापासून स्टेशनपर्यंत आपल्या वाहनांतून न येता सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, हा हेतू आहे, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

महापालिकेने महामेट्रोस 30 वर्षांसाठी भाड्याने दिलेल्या 11 जागा

पालिका भवनासमोरील पार्किंगची जागा- 16,145.86 चौरस फूट
वल्लभनगर, एसटी डेपो येथील पार्किंगची जागा -6,458 चौरस फूट
फुगेवाडी जकात नाका येथील पार्किंगची जागा- 83,958.50 चौरस फूट
पालिका भवनासमोरील जागा-78,576.54 चौरस फूट
पालिका भवनाच्या प्रवेशद्वारालगतची जागा-5,381.95 चौरस फूट
दापोडी भोजवानी स्वीटजवळील पीएमपीएल बस थांब्यामागील जागा-4,383.06 चौरस फूट
फुगेवाडी लोकमान्य टिळक व मीनाताई ठाकरे शाळा- 5,931.99 चौरस फूट

पालिका भवनासमोरील तिरंगा हॉटेलच्या मागे- 14,929.54 चौरस फूट
वल्लभनगर -23,417 चौरस फूट
वल्लभनगर – 62,663.12 चौरस फूट
पालिका भवन आवारातील जागा -194 चौरस फूट
वाकड जकात नाक्याची जागा – 12,904.20 चौरस फूट (पीएमआरडीए- मेट्रो)
कासारवाडीतील मॅक्स न्युरो येथील जागा देण्यात आली नाही
पिंपरी ते निगडी विस्तारीत मार्गात आणखी काही जागा देण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT