99th Sahitya Sammelan President Pudhari
पुणे

99th Sahitya Sammelan President: रविवारी होणार साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड; बैठकीत होणार निर्णय

संमेलनाच्या तारखांसह ठरणार कार्यक्रमांची रूपरेषा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सातारा येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून, संमेलनाध्यक्षांसह संमेलनाच्या तारखा, कार्यक्रम काय असतील, याविषयी चर्चाही साहित्यवर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे.

अध्यक्षपदासाठी काही ज्येष्ठ साहित्यिकांची नावे चर्चेत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची रविवारी (दि.14) टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक होणार असून, या बैठकीत 99व्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या नावाची घोषणा होईल. हे संमेलन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार असल्याची शक्यता आहे. (Latest Pune News)

काही महिन्यांपूर्वीच पुण्यातच झालेल्या बैठकीत साहित्य महामंडळाने आगामी 99 व्या साहित्य संमेलन सातारा येथे होणार असल्याचे जाहीर केले. आता पुण्यातच संमेलनाध्यक्षांच्या निवडीसह तारखा आणि कार्यक्रम ठरणार आहेत. रविवारी (दि.14) साहित्य महामंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे.

या बैठकीला साहित्य महामंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर चार घटक संस्थांचे प्रत्येकी तीन असे 12 आणि बृहन्‌‍ महाराष्ट्रातील समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे 6 प्रतिनिधी तसेच विद्यमान अध्यक्ष असे 19 जण उपस्थित असतील.

या बैठकीत घटक संस्था, संलग्न आणि समाविष्ट संस्थांनी संमेलनाध्यक्ष पदासाठी सुचविलेल्या नावांवर सविस्तर चर्चा करतील. त्यानंतर सुचविलेल्या नावांपैकी संमेलनाध्यक्ष पदासाठी जे योग्य नाव असेल, त्या नावाची सर्वानुमते संमेलनाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात येईल.

ही बैठक साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आहे. त्यामुळे 99, 100 आणि 101 हे तीन महत्त्वाची साहित्य संमेलने मसापच्या नेतृत्त्वाखाली पार पडणार आहेत.

अनुवादकांना मिळावी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी

साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनुवादकांना संधी मिळावी, अशी मागणी अनुवादक संघाच्या वतीने मंगळवारी (दि.9) पत्रकार परिषदेत करण्यात आली.

अध्यक्षपदासाठी लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांच्या नावाचा विचार व्हावा, अशी विनंतीही अनुवादक संघाने केली असून, संघांच्या मागणीला राज्यभरातील विविध संस्था, संघटनांसह मराठी वाचनालयांनीही पाठिंबा दिल्याचे संघाचे रवींद्र गुर्जर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी चंद्रकांत भोंजाळ, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे यावेळी उपस्थित होते.

मार्गदर्शक समितीची शनिवारी बैठक

साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची बैठक शनिवारी (दि.13) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात आयोजित केली आहे. या बैठकीलाही घटक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित असतील. हे सदस्य संमेलनाच्या रूपरेषेवर चर्चा करतील.

तसेच संमेलनात कोणकोणत्या कार्यक्रमांचा समावेश असावा? ग्रंथदिंडीची वेळ कोणती असावी? परिसंवाद, मुलाखत, कविसंमेलन आदी कार्यक्रमांची संख्या किती असावी? याबाबत चर्चा करून आगामी साहित्य संमेलनाची रूपरेषा ठरवतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT