Shankar Kurhade Pudhari
पुणे

Shankar Kurhade Palkhi Seva: ७५ वर्षांच्या शंकर कुऱ्हाडेंची माउलींवर अढळ श्रद्धा; ५० वर्षांपासून पालखीचा भार खांद्यावर

वयाची पर्वा नाही, माउलींच्या सेवेसाठी पायात येते बळ; मुलाकडे वारसा सोपवूनही खांदेकरी म्हणून सेवा सुरूच

पुढारी वृत्तसेवा

आळंदी: वय झालं म्हणून काय झालं? शरीराने साथ दिली नाही तरी माउलींची ओढ पायात बळ आणते. माउलींच्या पालखीची सेवा करण्याचं जे भाग्य मला मिळालं, ती माझी ताकद नाही तर माउलींचीच कृपा आहे. जोपर्यंत श्वासात श्वास आहे आणि जोपर्यंत माउलींची इच्छा आहे, तोपर्यंत ही सेवा चुकणार नाही, हे सांगताना ७५ वर्षांच्या खांदेकरी शंकर कुऱ्हाडे यांच्या डोळ्यांतील विठ्ठल भक्तीचे अश्रू आणि चेहऱ्यावरील समाधान बरेच काही सांगून जाते.

​आळंदीचे रहिवासी असलेले शंकर कुऱ्हाडे गेल्या ५० वर्षांपासून अखंडितपणे माउलींच्या पालखीचे 'खांदेकरी' म्हणून सेवा करत आहेत. वय ७५ झालेल्या या माउलींच्या लाडक्या वारकऱ्याचा उत्साह आजही तरुण वारकऱ्यांना लाजवेल असाच आहे.

यंदाही वयाच्या या टप्प्यावर त्यांनी आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यात खांदेकरी म्हणून सहभागी होण्याचा ठाम निश्चय केला आहे. ​माउलींच्या पालखी सोहळ्यात 'खांदेकरी' असणे हे अत्यंत मानाचे आणि तितकेच कष्टाचे काम मानले जाते. गेल्या पाच दशकांपासून माउलींच्या पालखीचा भार आपल्या खांद्यावर लीलया पेलणारे शंकरराव खऱ्या अर्थाने सेवेकरी आहेत.

आता वाढत्या वयामुळे त्यांनी आपला हा खांदेकरी असण्याचा वारसा आपल्या मुलाकडेही सोपवला आहे. मुलगाही आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून खांदेकरी म्हणून पालखी सोहळ्यात सेवा देत आहे. पण, मुलाकडे जबाबदारी दिली असली तरी बापाचे खांदे मागे हटायला तयार नाहीत.

माउलींनी माझ्याकडून ५० वर्षे सेवा करून घेतली, आता मुलगाही तीच सेवा पुढे नेतोय. पण मी देखील यंदा खांदेकरी म्हणून रथासोबत, माउलींच्या सोहळ्यात शेवट पर्यंत चालणार, असा भावूक विश्वास त्यांनी या वेळी त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT