परिंचे: वीर (ता. पुरंदर) येथील धरणक्षेत्रात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पडत असणार्या सततच्या पावसामुळे पाणीसाठ्यात भरमसाट वाढ झाली आहे. निरा खोर्यातील भाटघर, निरा देवघर, गुंजवणी या धरण क्षेत्रातही गेल्या आठवड्यापासून सततचा पाऊस पडत असल्यामुळे ते पाणी देखील वीर धरणामध्ये येत आहे.
परिणामी, वीर धरणातील पाणीसाठा गुरुवारी (दि. 19) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 62 टक्के झाला. त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. (Latest Pune News)
पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील शेतकर्यांची जीवनदायिनी असलेल्या निरा नदीत शुक्रवार (दि. 20) पासून वीर धरणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तसेच अवकाळी पाऊसही नेहमीपेक्षा जास्त पडल्याने निरा नदीवरील वीर धरण 50 टक्क्यांचा टप्पा पार करून भरतीच्या दिशेने चालले आहे.
यावर्षी प्रथमच मान्सूनपूर्व तसेच आता मोसमी पाऊस वेळेत येऊन धुवाधार बॅटिंग करीत आहे. त्यामुळे वीर धरणात मोठा साठा झाला असून, पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न संपूर्ण मिटला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला यावर्षी आनंदाचे दिवस येणार आहेत.- मंजूषा धुमाळ, सरपंच, वीर
वीर धरण सद्य:स्थितीत 62.60 टक्के भरले असून, निरा खोर्यातील चारही धरण क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणातून पुढील 12 तासांत निरा नदीमध्ये शुक्रवारी सकाळी 6 वाजेपासून 2 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने काळजी घ्यावी तसेच नदीपात्रात कोणीही जाऊ नये.- संभाजी शेडगे, कर्मचारी, पाटबंधारे विभाग