पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोरोना प्रतिबंधक लसीचा दक्षता म्हणजेच बूस्टर डोस आतापर्यंत 60 वर्षांपुढील सहव्याधीग्रस्त असलेल्या 1 लाख 54 हजार 390 जणांना देण्यात आला आहे. म्हणजेच, सहव्याधी असलेल्यांनी हा डोस घेण्याचे प्रमाण 58 टक्के एवढे आहे.
पुणे शहरामध्ये हा डोस घेणार्यांचे प्रमाण पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीणच्या तुलनेत अधिक आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण कोरोना प्रतिबंधक लसीची तिसरी म्हणजेच वर्धक मात्रा (बूस्टर डोस) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, इतर विभागांतील आघाडीचे कर्मचारी आणि 60 वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना दक्षता डोस देण्यात येत आहे.
शहरासह जिल्ह्यातील 60 वर्षांपुढील 11 लाख 39 हजार नागरिकांपैकी दोन लाख 65 हजार 473 सहव्याधीग्रस्त असलेले नागरिक वर्धक मात्रेसाठी लाभार्थी म्हणून जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहेत. त्यामध्ये पुण्यातील 95 हजार 730 लाभार्थ्यांपैकी 78 हजार 718 जणांना (82 टक्के) दक्षता डोस देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील 56 हजार 355 लाभार्थ्यांपैकी 31 हजार 444 जणांना (56 टक्के), तर ग्रामीण भागातील एक लाख 13 हजार 388 लाभार्थ्यांपैकी 44 हजार 228 जणांना (39 टक्के) अशा एकूण एक लाख 54 हजार 390 जणांना (32 टक्के) वर्धक मात्रा देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्य कर्मचार्यांना वर्धक मात्रा म्हणून लसीची तिसरी मात्रा देण्यास 10 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.
शहरात तिसर्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या सोमवारी पाहायला मिळाली. शहरात सोमवारी केवळ 44 रुग्ण आढळून आले,
तर बाधित दरही 1.5 टक्क्यावर आला आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेत शहरात दैनंदिन रुग्णसंख्या 8 हजारांच्या जवळपास गेली होती. मात्र, महिनाभरातच ही रुग्णसंख्या उतरणीला लागली. डिसेंबरच्या शेवटी सुरू झालेली लाट जानेवारी महिनाअखेरीस उतरणीला लागली होती. फेब्रुवारी महिनाअखेरीस तर एकदमच कमी झाली असून, ती आता 44 वर आली आहे.
शहरात सोमवारी दिवसभरात 44 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून, दिवसभरात 131 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात 2649 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली, तर पुणे शहर आणि पुण्याबाहेरील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या 65 रुग्णांवर ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत, तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 7 आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 8 रुग्ण आहेत. शहरात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 6 लाख 60 हजार 411 झाली असून, त्यापैकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 1145 इतकी आहे. आतापर्यंत 9345 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, तर आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 6 लाख 49 हजार 921 इतके झाले आहेत.
जिल्ह्यामध्ये तिसर्या लाटेनंतर दुसर्यांदा एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. यामुळे दिलासा मिळणार असला, तरीदेखील अजूनही नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सोमवारी पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये केवळ 105 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
दिवसभरात आढळलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 44, पिंपरी-चिंचवडमधील 30, ग्रामीण, नगरपालिका, कॅन्टोन्मेंट भागातील 31 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 240 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 14 लाख 50 हजार 903 जणांना कोरोनाची लागण झाली, तर त्यापैकी 14 लाख 29 हजार 59 जण बरे झाले आहेत. सध्या 282 जणांवर रुग्णालयात आणि 1 हजार 895 जणांवर घरी उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 19 हजार 674 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 8 हजार 964 जणांची चाचणी करण्यात आली.
सोमवारी शहरात केवळ 44 जण बाधित आढळले असून, तिसर्या लाटेतील ही सर्वांत कमी रुग्णसंख्या ठरली आहे. तर, दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या 40 च्या आत आली होती. बाधित दरही दीड टक्क्याच्या आत आला आहे.
– डॉ. संजय वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे