आशिष देशमुख
पुणे: परकीय चलन आवक विवरण भरले नाही, म्हणून पुणे विभागातील 500 स्वयंसेवी संस्थांकडून एकूण 22 कोटी रुपयांचा विलंब दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 65 स्वयंसेवी संस्थांकडून विदेशातून आलेल्या देणग्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत.
ही आकडेवारी सन 2021 ते 2024 या कालावधीतील असून, ही कारवाई केंद्र आणि राज्याच्या गृह विभागाने केली आहे. तर दुसर्या बाजूला सामान्य पुणेकरांनी जून 2025 अखेर 1,244 कोटी रुपये (50 टक्के) इतका मालमत्ताकर भरला आहे. मे 2025 अखेर तब्बल 2 हजार 133 कोटी रुपये इतका वस्तू व सेवाकर भरला आहे. (Latest Pune News)
सरकारची शहरातील स्वयंसेवी संस्थांवरही बारीक नजर असून वार्षिक विवरण वेळेत न भरणार्यांना दंड आकारण्यात आला आहे. ही आकडेवारी जाहीर करताना संस्थांची नावे मात्र गोपनीय ठेवली आहेत. कारण दंड हीच शिक्षा असल्याने कर चुकवणार्यांची नावे जाहीर केली जात नाहीत. वार्षिक रिटर्न दाखल करणार्या सुमारे 1 हजार स्वयंसेवी संस्था शहरात आहेत. यातील सुमारे 500 संस्था गृहविभागाच्या रडारवर आल्या.
कारण या संस्थांनी वार्षिक विवरणच भरले नाही. त्यामुळे सर्व मिळून सुमारे 22 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी 65 स्वयंसेवी संस्थांना विदेशातून मिळालेल्या देणग्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गृह विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. दुसर्या बाजूला मालमत्ता आणि वस्तू व सेवाकर भरण्यात पुणेकर राज्यात दुसर्या क्रमांकावर आहेत. महापालिकेकडे पुणेकरांनी यंदाचा 50 टक्के कर 30 जूनअखेर भरून टाकला आहे.
दृष्टीक्षेपात...
राज्यात सन 2016 ते 2020 पर्यंत 6 हजार 600 हून अधिक एनजीओजचे परवाने रद्द
विभागात सुमारे 1800 एनजीओ नोंदणीकृत, शहरात 1000 पेक्षा जास्त नोंदणी
शिक्षण, आरोग्य, महिला, बालविकास, पर्यावरण, दारिर्द्य निर्मूलन या विषयावर शहरात राज्यात सर्वाधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत.
गृह मंत्रालयाने 335 एफसीआरए-नोंदणीकृत एनजीओचे ऑडिट केले. त्यात 60 टक्के संस्था कारवाईस पात्र ठरल्या
शहराच्या वस्तू व सेवाकर परताव्यात मात्र मोठी वाढ झाली आहे. विभागात आर्थिक वर्ष 2023-24 साठी कर वस्तू व सेवाकर प्राप्तीमध्ये 11 हजार 163.44 कोटी रुपये कर जमा झाला.
विभागात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मे महिन्यापर्यंत एकूण 2 हजार 133.78 कोटी कर जमा झाला.
पुणेकरांनी जूनअखेर भरला 1 हजार 244 कोटी रुपयांचा मालमत्ताकर..
दुसर्या बाजूला सामान्य पुणेकरांची बाजू मात्र खूप सकारात्मक आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षातील मालमत्ता करापोटी 30 जून 2025 पर्यंत 1244 कोटी रुपये कर भरला आहे. मालमत्ता करापोटी पालिकेचे उद्दिष्ट 2 हजार 500 कोटी आहे. त्यापैकी 50 टक्के रक्कम जूनमध्येच वसूल झाली आहे. तसेच मालमत्ता करापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे 30 जून 2025 अखेर 966 कोटी रुपये जमा झाले आहेत.
स्वयंसेवी संस्थांसह ज्या कंपन्या किंवा व्यक्ती निधीचा गैरवापर, तसेच नियमांचे उल्लंघन करतात, अशा संस्थांना नोटीशी पाठविल्या जातात. वारंवार स्मरणपत्रे, नोटीस पाठवूनही ज्या संस्था वार्षिक विवरण पत्र भरत नाहीत. त्यांच्यावर शेवटी गृह विभागाच्या वतीने अशा प्रकारे कारवाई केली जाते.-अनुरुद्र चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स संघटना, पुणे