शिरूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर व हवेली तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत शिरूर शहरासाठी 500 कोटींचा निधी मिळवण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न होणार असून, विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवण्याचे आवाहन शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी केले आहे.
नगरपरिषद सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.या वेळी आ. कटके म्हणाले, शहराचा कायापालट होऊन तो शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या सुसज्ज व्हावा, यासाठी आतापर्यंत 35 कोटींचा निधी दिला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. हे काम लवकरच सुरू होणार आहे. (Latest Pune News)
दिवंगत उद्योगपती रसिकलाल धारिवाल, माजी नगराध्यक्ष शहीदखान पठाण व माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्मारक उभारण्याबाबतही बैठकीत मागणी झाली असून, त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे कटके यांनी स्पष्ट केले.