अजितदादा फिशमाफियांना टायरमध्ये कधी घालणार? ‘उजनी’त रोज 50 ते 60 टन अवैध मासेमारी File Photo
पुणे

Illegal fishing in Ujani Dam: अजितदादा फिशमाफियांना टायरमध्ये कधी घालणार? ‘उजनी’त रोज 50 ते 60 टन अवैध मासेमारी

Ajit Pawar News: ‘उजनी’त लहान माशांची मासेमारी फोफावली

पुढारी वृत्तसेवा

When will Ajit Dada Pawar act on illegal fishing?

भिगवण: राष्ट्रवादी पक्षाची प्रतिमा स्वच्छ व चांगली राखण्यासाठी एक नंबरचा व्यवसाय करा, दोन नंबरचा नको, नाही तर टायरमध्येच,’ अशी घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र, उजनी जलशायातील लहान मासे मारू नका, अशा सक्त सूचना त्यांनी देऊनही त्यांच्याच पक्षाच्या काही फिशमाफियांनी हैदोस घालत रोज 50 ते 60 टन अवैद्य लहान मासेमारी करून मत्स्यसंपदा व पर्यावरणाचा अक्षरशः र्‍हास चालवला आहे.

लहान मासेमारी करून त्याची तस्करी करून फिशमाफिया एकप्रकारे दोन नंबरचा गोरखधंदा करीत असल्याने अजितदादा आता या स्वपक्षाच्याच फिशमाफियांना टायरमध्ये घालणार तरी कधी? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. (latest pune news)

एवढेच नाही, तर फिशमाफियांनी अवघ्या ‘उजनी’त दहशत व दादागिरी सुरू केली आहे. लहान मासेमारी करण्यास विरोध करणार्‍या गरीब मच्छीमारांना पोलिस व अधिकार्‍यांसमोर बेदम मारहाण केली जाते, महिलांचा विनयभंग केला जातो. अर्वाच्य शिवीगाळ केली जाते. वाळू व्यवसायापेक्षा मोठी गुंडगिरी या मासेमारीत बोकाळली आहे.

मिळणार्‍या अफाट पैशातून फिशमाफियांचे अधिकारी व पोलिसांशी मैत्रीपूर्ण व अर्थपूर्ण संबंध जुळल्याने फिशमाफिया खुलेआम पोलिस ठाण्यात तसेच शासकीय कार्यालयात उजळमाथ्याने फिरत आहेत. त्यामुळे ‘उजनी’तील अवैद्य मासेमारी ही बीडच्या वळणावर चालली आहे. मारहाण, शिवीगाळ, कोयतेहल्ले झाले आहेत. आता फक्त मुडदे पडायचे राहिले आहे. त्यानंतर प्रशासनाला जाग येईल की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जलसंपदा विभागाचे अधिकारी याला खतपाणी घालत असल्याने या फिशमाफियांनी मुजोर बनून नंगानाच चालवला आहे. या फिशमाफियांना वेळीच ठेचले नाही, तर परिस्थिती एक ना एक दिवस नियंत्रणाबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. ’उजनी’च्या मासेमारी व्यवसायावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह सुरू आहे. यामध्ये मच्छीमार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, तोडणारे, वाहतूक करणार्‍यांचा समावेश आहे.

बोलघेवड्या फिशमाफियांमुळे व्यवसायाला अवकळा

लहान मासे मारू नका, असे अजित पवार यांनीच नाही, तर मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे, तसेच पुणे जिल्हाधिकारी यांनी ठोस निर्णय व सूचना केल्या आहेत. मात्र, बोलघेवड्या फिशमाफियांनी सरकारी बाबूंना हाताला धरून धंदा करून घेतला आहे.

वास्तविक ‘उजनी’त झालेल्या अवैध मासेमारीची चौकशी झाली, तर डोळे विस्फारून तर जातीलच; शिवाय फिशमाफियांचे मोर्चे या व्यवसायात का उतरले आहेत, याचाही उलघडा होईल. तसेच, फिशमाफियातील आका, बोकाचा चेहरा व सहभाग देखील उघड होईल.

पवार, भरणे यांच्या चांगल्या निर्णयाची माती

गेल्या 29 वर्षांत अवैध मासेमारी मोठ्या प्रमाणात झाल्याने ‘उजनी’तील जवळपास 40 ते 50 माशांच्या जाती दुर्मीळ व नामशेष झाल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘उजनी’त मत्स्यबीज सोडण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला.

तसेच, मत्स्यसंवर्धनासाठी लहान मासे मारण्यावर बंदी घालण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या. त्यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली होती. असे असताना फिशमाफियांनी यावर्षी उजनीचे पाणी कमी होऊ लागताच बंदी असलेल्या वडाप व पंड्याच्या साहाय्याने बेसुमार मासेमारी सुरू करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या चांगल्या निर्णयाची माती केली आहे.

स्थानिक मच्छीमार संघटनेने लहान मासेमारी करण्यास सर्व शासकीय विभागाचे उंबरठे झिझवले. मात्र, अधिकारी, पोलिस व फिशमाफियांच्या अभद्र युतीमुळे गेेी अडीच महिने हजारो टन लहान मासे मारले गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT