पुणे

Pune News : युट्युब चॅनेलला सबक्राइब करणे पडले 50 लाखाला

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : युट्युब चॅनेल सबक्राइब केल्यास कमिशन मिळेल, असे सांगून सायबर चोरट्याने एका आयटी इंजिनीअर तरुणाची 49 लाख 68 हजार 175 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 34 वर्षीय आयटी इंजिनिअरने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विविध मोबाईल नंबर आणि टेलिग्राम आयडीधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 ते 23 ऑगस्ट दरम्यानच्या काळात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा मगरपट्टा सिटीतील एका आयटी कंपनीत कामाला आहे. त्याला नवीन फ्लॅट खरेदी करायचा होता. त्यामुळे त्याने हे पैसे साठवून ठेवले होते. सायबर चोरट्याने फिर्यादीला व्हॉट्सअपवर संपर्क करून युट्युब चॅनेलला सबक्राइब व लाईक केल्यास कमिशन देण्यात येईल, असे सांगितले. तसेच फिर्यादी यांना पहिल्यांदा 50 रुपये, नंतर 100 रुपये असे 1 हजार 350 रुपये देऊन विश्वास संपादन करण्यात आला. यानंतर सायबर चोरट्याने फिर्यादी यांना टास्कसाठी एक लिंक पाठवली आणि त्यानंतर विविध कारणे सांगून 13 व्यवहार करून 49 लाख 68 हजार 175 रुपये घेऊन फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT