पुणे

48 तास आधीच पुराचा अंदाज; संगणक प्रणालीद्वारे माहिती मिळणार

अमृता चौगुले

शिवाजी शिंदे

पुणे : पुणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणार्‍या पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे 48 ते 72 तास आधीच नदीला येणार्‍या पुराचा अंदाज समजणार आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कोयना, कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांना काही वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामुळे आर्थिक हानीबरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. अर्थात हा मोठा पाऊस धरणक्षेत्राच्या खालील भागात झाला होता, असे मत जलसंपदा विभागाचे होते.

असे असले तरी आता मात्र जलसंपदा विभागात कार्यरत असलेले मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येत असलेल्या पुराचा अभ्यास करून त्यावर अनेक उपाययोजना सुचविल्या आहेत. पुराचे पूर्वानुमान सांगण्यासाठी तयार केलेल्या या संगणकीय प्रणालीसाठी कोयना, कृष्णा, पंचगंगा, वारणा या नद्या व त्यावरील 22 धरणे, तसेच कर्नाटकमधील अलमट्टी आणि हिप्परगी या धरणांचा अभ्यास करण्यात आला आहे.

अर्थात हिप्परगी व अलमट्टी धरणांच्या फुगवट्याचा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणा-या पुरावर परिणाम होत नाही. मात्र, कृष्णा खो-यातील 22 धरणे पुराची दाहकता कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. ही धरणे नसती, तर पुराची दाहकता 150 ते 200 टक्के वाढली असती. याबाबत माहिती देताना पूर अभ्यासक धुमाळ म्हणाले, 'पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे. ती टाळू शकत नाही. मात्र, धरणांचे एकत्रित परिचलन केले, तर पुराची दाहकता कमी करू शकतो.

एकत्रित परिचलनासाठी आवश्यक असलेली संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली 'हेकॅस' या सॉफ्टवेअरमध्ये आहे. म्हणजेच एखाद्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जो पाऊस पडतो, त्या पावसाची परिणती पुरामध्ये कशी होणार, हा पूर कृष्णा नदी आणि त्याच्या उपनद्यांबरोबर अलमट्टी धरणापर्यंत कसा जाणार, या प्रवासादरम्यान नदीमधील पुराची पातळी कशी वाढणार किंवा कमी होणार, हा पूर किती क्षेत्रावर पसरणार, तसेच किती वेळात पूर ओसरणार, याचा अचूक अंदाज 48 ते 72 तास आधीच मिळणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT