पुणे

शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर आठवड्यात 400 कोटींचे अनुदान वर्ग

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कृषि विभागाने विविध योजनांमध्ये सहभागी 2 लाख 76 हजार शेतकर्‍यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर 820 कोटी रुपयांचे अनुदान प्रत्यक्ष डीबीटीद्वारे वर्ग केलेले आहे. उर्वरित 400 कोटी रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु असून, मार्च 2022 अखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजेच एका वर्षात डीबीटीद्वारे 1200 कोटींचे अनुदान यशस्वीरित्या शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याची माहिती कृषि आयुक्तालयातून देण्यात आली.

कृषि विभागाने माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करुन महाडीबीटी प्रणाली विकसित करुन एक शेतकरी-एक अर्ज ही संकल्पना अंमलात आणलेल्या प्रणाली यशस्वी झाली आहे. केवळ एकाच अर्जाद्वारे शेतकर्‍यांना कृषि विभागाच्या विविध योजनांचे लाभ घेता येत आहेत. याकामी कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषि विभागामध्ये अनेक नविन उपक्रम व योजना सुरु केल्याचे चांगले परिणाम आता दिसून येत आहेत.

शेतकर्‍यांना कृषि विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागत होता. तसेच प्रत्येक अर्जासोबत सारखीच कागदपत्रे जोडावी लागत होती. त्यामध्ये शेतकर्‍यांचा वेळ व पैसाही खर्च होत होता. आता 'एक शेतकरी-एक अर्ज'मुळे चालू आर्थिक वर्षात निवड झाली नाही तर हाच अर्ज पुढील आर्थिक वर्षात ग्राह्य धरण्याची सुविधादेखिल आहे.

शेतकरी घरबसल्या विविध योजनांसाठी अर्ज करु शकतो. तसेच आपल्या अर्जाची सद्यस्थिती शेतकरी मोबाईल अ‍ॅपद्वारे पाहू शकतात. लक्षांकापेक्षा जास्त अर्ज आल्यास संगणकीय सोडतीद्वारे प्रत्येक तालुकानिहाय लाभार्थी शेतकर्‍यांची पारदर्शी निवड केली जाते. वर्षभरात 22 लाख शेतकर्‍यांनी महाडीबीटी प्रणालीवर नोंदणी केली आहे. या प्रणालीमुळे कृषि विभागाच्या योजनांचा लाभ पारदर्शक पध्दतीने व सुलभरीत्या तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे.

SCROLL FOR NEXT