पुणे : पुढारी वृत्तसेवा : तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला न्यायालयाने 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी तरुणाला मोठ्या सुरक्षेत बुधवारी (दि. 28) सकाळच्या सत्रात न्यायालयात हजर करण्यात आले. शंतनू लक्ष्मण जाधव (वय 21, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंध संपविल्याच्या रागातून त्याने मंगळवारी (दि. 27) सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने वार करीत तिच्या खुनाचा प्रयत्न केला होता.
या हल्ल्यात तिच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. हल्ला झालेल्या 20 वर्षीय मुलीने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीवर हल्ला करीत असतानाच जाधव याला लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी पकडले. त्यामुळे या हल्ल्यातून तरुणी बचावली. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी चोप देऊन जाधव याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अटक केल्यानंतर जाधव याला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आरोपी जाधव याच्या रक्ताचा नमुना काढून तो रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा पुढील तपासासाठी वापर होणार आहे. तर, जाधव याने कोयता कोठून आणला, याबाबत त्याकडे तपास करायचा आहे. हा गुन्हा जाधव याने कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अॅड. वर्षाराणी जाधव यांनी केला. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचादेखील पोलिस तपास करीत असल्याचा युक्तिवाद अॅड. जाधव यांनी केला. तरुणाला न्यायालयाने 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पूनम पाटील करीत आहेत.
हे ही वाचा :