Pune International Marathon Pudhari
पुणे

Pune International Marathon: डिसेंबरमध्ये 39 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात मोठा बदल

7 डिसेंबरला स्पर्धेला सुरुवात; 15 हजार स्पर्धकांची अपेक्षा, 35 लाखांची बक्षिसे

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदा पुरुष-महिला पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजक ॲड. अभय छाजेड, वसंत गोखले आणि सुमंत वाईकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (दि. 7 डिसेंबर) पहाटे 3 वाजता सुरू होईल. सणस मैदान परिसरातील हॉटेल कल्पना-विश्व चौकातून या 42.195 किलोमीटरच्या पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येईल. तसेच, पहाटे 3.30 वाजता पुरुष- महिला (21.095) अर्ध मॅरेथॉन, 10 कि.मी. सकाळी 6.30 वाजता, 5 कि.मी. सकाळी 7.00 वाजता आणि सकाळी 7.15 वाजता व्हील चेअर 3 कि.मी. या स्पर्धांना सुरुवात होईल.

सणस मैदानासमोरील हॉटेल कल्पना-विश्व चौकातून निघून सणस चौक - बाजीराव रस्ता - नगरकर तालीम- लक्ष्मी रोड- कुलकर्णी पेट्रोल पंप तेथून फिरून शनिवारवाडा- शिवाजी पूल- मनपा भवन- मॉडर्न कॅफे- जंगली महाराज रोड- डेक्कन जिमखाना- संभाजी महाराज पुतळा- खंडूजीबाबा चौक- कर्वे रस्ता- कर्वे पुतळा- डावीकडे वळून इराणी कॅफे- करिश्मा बिल्डिंग- म्हात्रे पूल येथे वळून मेहेंदळे गॅरेज- डी. पी. रोड- जोशी किचन- पंडित फार्म- राजाराम पूल- सिंहगड रोड- डावीकडून नवशा मारुती- पु. ल. देशपांडे उद्यान- पानमळा- दांडेकर पूल- पर्वती पायथा- महालक्ष्मी चौक- सारसबाग- सणस पुतळा येथून डावीकडे हॉटेल कल्पना-विश्व हा 21.095 कि.मी.चा पहिला टप्पा पूर्ण करून तेथूनच दुसरा टप्पा सणस पुतळा- महालक्ष्मी चौक- स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोरून, खंडोबा मंदिराहून दांडेकर चौक तेथून सरळ सिंहगड रस्ता मार्गे, गणेश मळा, राजाराम पूल, संतोष हॉल, गोयल गंगा चौक, धायरी पुलावरून, नांदेड सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊन डिस्टेंशन सेंटर येथे सर्कलला गोल वळसा घेऊन परत त्याच मार्गे सणस मैदानाकडे परत येईल व 42.195 ची पूर्ण मॅरेथॉन सणस मैदानात पूर्ण होईल.

या मॅरेथॉनमध्ये 15 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महानगरपालिकेतर्फे 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. पुरुष व महिला मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉन गटातील पहिल्या तीन भारतीय क्रमांकांच्या स्पर्धकांना विशेष पारितोषिके देण्यात येतील.

या वर्षी इथियोपिया, केनिया, टांझानिया, मॉरिशस इत्यादी देशांतून आत्तापर्यंत 70 हून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. याशिवाय सेनादल, रेल्वे, पोलिस, आर्मी स्पोट्‌‍र्स इन्स्टिट्यूट, बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ, एनडीए यांच्याही प्रवेशिका येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT