पुणे : सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, विठ्ठलनगर व निंबजनगर या मुठा नदीलगतच्या भागातील पूरपरिस्थिती रोखण्यासाठी याठिकाणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने आराखडा तयार केला आहे. त्यासाठी सुमारे 369 कोटींचा खर्च अपेक्षित असून या खर्चाला महापालिकेस पूर्वगणक समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी दिली आहे. (pune latest News)
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण साखळीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडल्याने सिंहगड रस्त्यावरील मुठा नदीलगतच्या एकतानगर, विठ्ठलनगर आणि निंबजनगर या सखल भागांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते.
अनेक इमारती व वस्त्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यांनी घटनास्थळाचा पाहणी दौरा केला होता. तसेच, पूरस्थिती रोखण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर यंदाही या भागात काही सोसायट्यांमध्ये पूराचे पाणी घुसले होते. त्यामुळे ही पूरस्थिती रोखण्यासाठी तसेच नदीकाठ विकसन प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेकडून सुरुवातीला 300 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने शासनाकडे आपत्ती व्यवस्थापन निधीतून 300 कोटींची तरतूद करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव 26 जून 2025 रोजी नगरविकास विभागाकडे मान्यतेच्या प्रक्रियेत आहे.
वडगाव खुर्द ते राजाराम पूल या 4.10 कि.मी. लांबीच्या स्ट्रेच-6 मध्ये मुठा नदीपात्राच्या दोन्ही बाजुंनी ही कामे करण्यात येणार आहेत. या कामांत दोन्ही काठांवर ‘एम्बँकमेंट’ करून पूरवहन क्षमता वाढविणे, नागरिकांसाठी पथदिवे, घाट तसेच सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीकाठी असलेल्या वस्त्यांना पुरापासून संरक्षण मिळेल, असा महापालिकेचा दावा आहे. या प्रकल्पासाठी सुरुवातीला 300 कोटींचा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, तपशीलवार पूर्वगणनपत्रकानुसार या कामांचा खर्च जीएसटीसह अन्य कर वगळता 369 कोटींवर गेला आहे.