पुणे : गुंतवणूक केलेल्या पैशावर शंभर दिवसांत दुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने तिघांना 36 लाख 10 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नीलेश जेधे (रा. नांदेड सिटी), जीवन मागाडे (रा. वडगाव) या दोघांविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिल शिंदे (वय 53, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादींचा एका ठिकाणी परिचय झाला होता. त्या वेळी लीनक्स ट्रेड डॉट युके या कंपनीत पैसे गुंतवले तर शंभर दिवसात डबल रक्कम देण्याचे प्रलोभन आरोपीने फिर्यादींना दाखवले. फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून व त्यांच्या दोन मित्रांकडून 36 लाख 10 हजार रुपये आरोपीने घेतले. मात्र त्यानंतर शंभर दिवसात दुप्पट रक्कम दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सय्यद करत आहेत.
हे ही वाचा :