पुणे

3500 नवजात बालकांना संजीवन; विशेष नवजात काळजी कक्षाचे यश

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा, उपजिल्हा आणि महिला रुग्णालयांमध्ये आजारी नवजात आणि कमी वजनाच्या नवजात बालकांचे व्यवस्थापन आणि उपचार करण्यासाठी 'विशेष नवजात काळजी कक्षा'ची स्थापना करण्यात आलेली असून, गेल्या दोन वर्षात या विशेष नवजात काळजी कक्षामध्ये अत्यंत कमी वजन (1500 ग्राम पेक्षा कमी) असलेल्या 3,742 नवजात बालकांवर मोफत यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत.

विशेष नवजात काळजी कक्षामध्ये दरवर्षी अंदाजे 50,000 गंभीर आजारी बालकांवर उपचार केले जातात. सन 2022-23 व 2023-24 (ऑक्टोबर अखेर) या कालावधीत अत्यंत कमी वजनाच्या (1500 ग्राम पेक्षा कमी) एकूण 3,742 नवजात बालकांवर यशस्वीरित्या उपचार करुन डिस्चार्ज करण्यात आले. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 18 जिल्हा रुग्णालये, 11 महिला रुग्णालये, 13 उपजिल्हा रुग्णालये, 4 सामान्य रुग्णालये, 1 ग्रामीण रुग्णालय आणि 5 कॉर्पोरेशन हॉस्पिटल मिळून एकूण 52 विशेष नवजात काळजी कक्ष कार्यरत आहेत.

प्रत्येक विशेष नवजात काळजी कक्षामध्ये 1 बालरोग तज्ज्ञ, 3 वैद्यकीय अधिकारी, 10 परिचारिका आणि 4 सहाय्यक कर्मचार्यांसह किमान 12 ते 16 खाटा असून, नवजात किंवा विशेष काळजीची आवश्यकता असणार्‍या बालकांसाठी चोवीस तास सेवा प्रदान केली जाते. हे सर्व कक्ष रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्फ्युजन पंप, सीपीएपी, मॉनिटर्स यांसारख्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असून, आजारी नवजात अर्भकांना हायपोथर्मिया, सेप्सिस/इन्फेक्शन, काविळ, प्रतिजैविक, असिस्टेड फिडिंग यांसारख्या सेवा पुरविल्या जातात, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

ज्या गंभीर नवजात बालकांना श्वासोच्छवासाच्या आधाराची आवश्यकता असते त्यांच्याकरिता नॉन-इनवेसिव्ह व्हेंटिलेशन (उदा. सीपीएपी), अकाली जन्मलेल्या नवजात अर्भकासाठी सर्फॅक्टंट यांसारख्या सेवा पुरवल्या जातात. तसेच कमी वजनाच्या बाळांकरिता कांगारू मदर सेवा, जन्मजात आंधळेपणा, जन्मजात बहिरेपणा यासारख्या विशेष तपासण्या केल्या जातात. या ठिकाणी सर्व तपासण्या व उपचार मोफत केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT