Smart TOD meters Maharashtra
शिवाजी शिंदे
पुणे: राज्यात वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महावितरणने आतापर्यंत वीजवाहिन्या, रोहित्रे, शासकीय कार्यालये आणि ग्राहकांकडे मिळून तब्बल 35 लाख स्मार्ट ‘टाईम ऑफ डे’ (टीओडी) मीटर बसवून ते कार्यान्वित केले आहेत. राज्यातील तीन कोटींहून अधिक वीज ग्राहकांना टप्प्याटप्प्याने हे मीटर बसवण्यात येणार असून, या योजनेमुळे वीज बचतीचा आणि सवलतीचा एक नवा अध्याय सुरू होत आहे.
आजवर केवळ औद्योगिक ग्राहकांसाठी मर्यादित असलेली ‘टाईम ऑफ डे’ वीजदर सवलत आता 1 जुलैपासून घरगुती ग्राहकांनाही लागू होणार आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, त्यांना दिवसा, म्हणजेच सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रति युनिट 80 पैसे सवलत मिळणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही सवलत 80 पैशांपासून ते 1 रुपयापर्यंत असेल, ज्यामुळे ग्राहकांना वीज बिलात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Latest Pune News)
स्मार्ट मीटर फायदेशीर
ज्यांच्या घरी सौरऊर्जा प्रकल्प आहेत, त्यांच्यासाठी वापरलेली आणि ग्रीडला परत दिलेली वीज, याचा अचूक हिशेब ठेवणे या मीटरमुळे अधिक सुलभ होणार आहे. पूर्वीच्या मॅकेनिकल आणि इलेक्ट्रॉनिक मीटरच्या प्रवासानंतर आता डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित हे स्मार्ट मीटर महावितरण आणि ग्राहक या दोघांसाठीही फायदेशीर ठरणार आहेत.
स्मार्ट मीटरबद्दलचे गैरसमज आणि तथ्य
मोफत मीटर : हे स्मार्ट मीटर ग्राहकांना पूर्णपणे मोफत बसवून दिले जात आहेत. याचा कोणताही आर्थिक भार ग्राहकांवर पडणार नाही.
पोस्टपेड, प्रीपेड नाही : सध्याची ‘आधी वीज वापरा, मग बिल भरा’ ही पद्धत कायम राहणार आहे. हे मीटर पोस्टपेड असून, प्रीपेड नाहीत.
वीजदरात वाढ नाही : मीटरच्या खर्चामुळे वीजदरात कोणतीही वाढ होणार नाही. केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून (ठऊडड) या मीटरसाठी अनुदान मिळत आहे. उर्वरित रक्कम महावितरण स्वतःच्या महसुलातून पुरवठादारांना 10 वर्षांच्या 120 हप्त्यांत देणार आहे.
स्वयंचलित रीडिंग : मीटर रीडिंग स्वयंचलित पद्धतीने होणार असल्याने मानवी चुका टळतील आणि बिलिंगच्या तक्रारी जवळपास संपुष्टात येतील.
मोबाईलवर माहिती : घरात किती वीज वापरली, याची अचूक माहिती ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे, ज्यामुळे विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.