पुणे: वाहतूक विभागातील 30 पोलिस कर्मचार्यांच्या तडकाफडकी अंतर्गत बदल्या केल्या आहेत. हे सर्व कर्मचारी डीओ (ड्युटी ऑफिसर) म्हणून काम पाहत होते. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी मंगळवारी (दि. 20) रात्री याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानंतर बंडगार्डन आणि लष्कर वाहतूक विभागात त्यांच्या तात्पुरत्या नेमणुका केल्या आहेत. त्यामुळे वाहतूक विभागातील ‘डीओगिरी’ला पोलिस आयुक्तांनी लगाम लावल्याचे बोलले जात आहे.
शहरात तीस वाहतूक विभाग आहेत. प्रत्येक विभागात एक कर्मचारी डीओ म्हणून काम करत असतो. त्याच्यावर विभागाच्या सर्व कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी असते. कर्मचार्यांना दैनंदिन कर्तव्य देणे, बंदोबस्ताची आखणी करणे, खटले, टपाल इत्यादी सर्व बाबींची पोलिस उपायुक्त कार्यालय वाहतूक यांना माहिती देणे, अशी कामे डीओला करावी लागतात. (Latest Pune News)
पोलिस ठाणे असो की वाहतूक विभाग, डीओच्या कामाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्यांना येथे काम करण्याची इच्छा असते. प्रभारी अधिकार्याकडून देखील आपल्या मर्जीतील व्यक्तीलाच डीओच्या खुर्चीवर बसविले जाते.
तर दुसरीकडे काही वाहतूक विभागातील डीओ मनमानी कारभार करतात, मर्जीतल्या लोकांनाच चांगले कर्तव्य देतात, इतर कर्मचार्यांना कर्तव्य देताना दुजाभाव करतात, त्यांच्याकडून अनेकदा कर्तव्य देताना विशिष्ट उदिष्ट ठेवले जाते, विभागात सुरू असलेल्या कामाचे परवाने देताना त्यांच्याकडून हेतू ठेवला जातो, अशा अनेक तक्रारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या दालनापर्यंत पोहचल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत पोलिस आयुक्तांनी डीओ कर्मचार्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, याबाबत अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, नुकतेच सर्व वाहतूक पोलिसांना एका कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्या बदल्या हा एक त्याचाच भाग आहे. वाहतूक विभागातील प्रभारी अधिकार्यांनी आपल्या कार्यालयीन कामकाजात जास्तीत जास्त लक्ष द्यावे. अनेकदा हे प्रभारी अधिकारी डीओवर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी कर्मचार्यांची दैनंदिन कर्तव्य, बंदोबस्ताची आखणी नियमित पाहावी, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात या कर्मचार्यांच्या बदल्या केल्या आहेत.
टेम्पो, क्रेनही रडारवर?
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टेम्पो आणि क्रेन प्रत्येक वाहतूक विभागाला देण्यात आले आहे. मात्र, ही कारवाई करताना टेम्पोवरील कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांकडून मिळून कारवाईची हेराफेरी केली जात असल्याची माहिती देखील पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचली आहे. विशेष म्हणजे, सुरू असलेल्या बोनटवर आयुक्तांचे लक्ष आहे. त्यामुळे टेम्पो आणि त्यावरील कामगारांचीसुद्धा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे.