पुणे

अकरावीच्या तिसर्‍या विशेष फेरीत 3 हजारांवर प्रवेश

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशाच्या तिसर्‍या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. तिसर्‍या विशेष फेरीत 3 हजार 337 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, 2 हजार 350 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. प्रवेश प्रक्रियेतील पात्रता गुणांमध्ये आता घट झाली आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या शनिवारपर्यंत (दि. 12) प्रवेश निश्चित करता येईल.

यंदा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 326 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 16 हजार 510 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी 1 लाख 1 हजार 229 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. केंद्रीभूत प्रवेशांसाठी 99 हजार 903 जागा, कोट्यांतर्गत प्रवेशांसाठी 16 हजार 607 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेर्‍या आणि दोन विशेष फेर्‍या झाल्या आहेत. गुरुवार सायंकाळपर्यंत एकूण 72 हजार 877 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या तिसर्‍या विशेष फेरीसाठी 4 हजार 185 विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यातील 3 हजार 335 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठीचे पात्रता गुण (कटऑफ) आता कमी झाले आहेत. त्यात कला शाखेसाठी सिम्बायोसिस महाविद्यालयात 446 गुण, वाणिज्य शाखेसाठी स. प. महाविद्यालयात 370 गुण, विज्ञान शाखेसाठी फर्ग्युसन महाविद्यालयात 462 गुण आवश्यक असल्याचे उपसंचालक कार्यालयातून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT