पुणे

ऐतिहासिक शिवपट्टण वास्तूंच्या संवर्धनासाठी 29 कोटींचा निधी

अमृता चौगुले
वेल्हे : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाच्या पायथ्याच्या पाल खुर्द (ता. वेल्हे) येथील ऐतिहासिक शिवपट्टण परिसरात उत्खननात सापडलेल्या छत्रपती श्रीशिवरायांच्या भव्य राजवाड्यासह विविध वास्तू, स्थळांचे नव्याने उत्खनन तसेच जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे राजगड परिसरातील मध्ययुगीन काळापासून शिवकाळातील इतिहास जगासमोर येणार आहे.  उत्खननात सापडलेल्या मध्ययुगीन, शिवकालीन अवशेषांचे जतन करणारा अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच ऐतिहासिक प्रकल्प असून, त्यासाठी पुरातत्त्व खात्याच्या वतीने कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
संबंधित बातम्या :
पुरातत्त्व खात्याच्या या प्रकल्पामुळे शेकडो वर्षांच्या काळाच्या लुप्त झालेला छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा ज्वलंत वारसा इतिहास ऐतिहासिक साहित्य वस्तू, साधने, वास्तू, स्थळांच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे. गेल्या वर्षी पुरातत्व खात्याने राजगडाच्या पायथ्याला शिवपट्टण परिसरात उत्खनन केले होते. त्या वेळी उत्खननात छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या भव्य राजवाड्यासह विविध बांधकामे, वास्तूंचे अवशेष, शिवकालीन नाणी व इतर साहित्य सापडले होते. छत्रपती श्रीशिवरायांचा वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व खात्याने वेगाने कार्यवाही सुरू केली. त्यानुसार शिवरायांचा राजवाडा, विविध वास्तू, संग्रहालय आदी वास्तूंची उभारणी करण्यासाठी तज्ज्ञ वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचा आराखडा पुरातत्त्व खात्याने शासनाला सादर केला होता. त्यास शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. छत्रपती श्रीशिवरायांच्या 350 राज्याभिषेक वर्षानिमित्त शिवरायांचा ज्वलंत वारसा जोपासण्यासाठी शासनाने भरघोस निधी दिला आहे.
तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत शासनाने शिवपट्टण परिसराच्या संवर्धनासाठी 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मध्ययुगीन ते शिवकाळातील बांधकामांचे अवशेष, वास्तू आदींचे संवर्धन व जतन करण्यात येणार आहे. या ठिकाणी पुन्हा उत्खनन करण्यात येणार आहे. सध्या या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. दीड एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहणार आहे. मध्ययुगीन काळातील उत्खननातील शिवकालीन अवशेषाचे जतन करणारा अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच ऐतिहासिक प्रकल्प आहे.
                                                – डॉ. विलास वाहणे  सहसंचालक,  पुरातत्व खाते, पुणे विभाग.
SCROLL FOR NEXT