पुणे

पिंपरी : ‘पीएमआरडीए’च्या 2800 घरांचे नागरिकांना ताबे

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) चिखली-पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पातील 2 हजार 821 घरांचे ताबे शुक्रवार (दि. 23) अखेर देण्यात आले आहेत. येत्या 26 तारखेपर्यंत ही कार्यवाही चालणार आहे.
पीएमआरडीएच्या वतीने पेठ क्रमांक 12 येथे पहिल्या टप्प्यात 4 हजार 883 घरे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांना घरे देण्यात येत आहेत.

आतापर्यंत 3 हजार 226 लाभार्थी नागरिकांनी घरांचे ताबे घेण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांनी हप्त्याची सर्व रक्कम पीएमआरडीए कार्यालयाकडे जमा केली आहे. तसेच, आवश्यक डेटा एंट्री प्रक्रिया व अन्य कार्यवाही पूर्ण केली आहे. तर, आत्तापर्यंत 1 हजार 74 नागरिकांचे दस्त सह-दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अंतिम करण्यात आले आहे. त्यातील शुक्रवारअखेर एकूण 2 हजार 821 नागरिकांना घरांचे ताबे देण्यात आले आहेत.

पीएमआरडीएच्या वतीने 6 जूनपासून ईडब्ल्यूएस आणि एलआयजी गटातील सदनिकांसाठी ताबा देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 6 ते 19 जूनपर्यंत वेळापत्रकानुसार ही कार्यवाही चालली. वेळापत्रकानुसार जे नागरिक घरांचा ताबा घेण्यासाठी उपस्थित राहिले नाही, त्यांच्यासाठी 22 तारखेपासून घरांचा ताबा देण्याची कार्यवाही केली जात आहे. 26 तारखेपर्यंत ही कार्यवाही चालणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 3 ही वेळ त्यासाठी निश्चित केली आहे.

दुसर्‍यांदा सोडत काढलेल्या लाभार्थ्यांची 1 जुलैपासून नोंदणी

पेठ क्रमांक 12 मधील काही घरांसाठी डिसेंबर 2022 मध्ये दुसर्‍यांदा सोडत काढण्यात आली होती. त्या सोडतीतील ज्या लाभार्थ्यांनी हप्त्याची सर्व रक्कम भरली आहे, त्यांची नोंदणीप्रक्रिया 1 जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याबाबतच्या विस्तृत सूचना पीएमआरडीएच्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT