शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले pudhari
पुणे

Pune Water blockage: पुण्यात पाणी साठणाऱ्या ठिकाणांमध्ये आणखी 28 स्पॉटची भर, काय आहे कारण?

कोट्यवधी खर्चूनही शहर तुंबलेलेच

पुढारी वृत्तसेवा

पुणे : या पावसाळ्यात पुणे तुंबू नये, यासाठी पालिकेने पाणी साठणार्‍या तब्बल 201 ठिकाणांची यादी करून त्या ठिकाणी पुन्हा पाणी साठणार नाही, यासाठी कामे केली. मात्र, या कामांची पोलखोल पहिल्याच पावसात झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून, कामे करण्यात आलेल्या ठिकाणांचाही यात समावेश आहे. एवढेच नाही, तर पाणी साठणार्‍या ठिकाणांमध्ये आणखी 28 स्पॉटची भर पडली आहे. (Pune News Update)

महापालिकेला पाणी साठणार्‍या ठिकाणांची यादी देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना करणार्‍या वाहतूक पोलिसांनी काही ठिकाणच्या कामांना परवानगी दिली नसल्याने तेथे पाणी साठल्याचे देखील समोर आले आहे. पुण्यात अतिवृष्टी झाल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी पाणी साठते. काही ठिकाणी तर पूरस्थिती तयार होते. रस्त्यावर पाणी साठल्याने वाहतुकीवरसुद्धा परिणाम होऊन कोंडी होते. त्यामुळे महापालिका शहरात पाणी साचणार्‍या ठिकाणांची यादी करून त्या ठिकाणी कामे करत असते. यात पोलिस प्रशासन देखील त्यांना कामे कारणासाठी काही ठिकाणे सुचवत असतात. गेल्या वर्षी पाणी साठणार्‍या 201 ठिकाणांची यादी महानगरपालिकेने केली होती. यातील 117 ठिकाणांची कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला होता, तर 84 ठिकाणांची कामे सुरू होती.

शहरात सुरू असलेल्या पावसामुळे महापालिकेने उपाययोजना केलेल्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा निधी हा पाण्यात गेल्याची टीका पालिकेवर केली जात आहे. आंबेठाण मंदिर रोड, अप्पर डेपो, बिबवेवाडी, गोकूळनगर, कामठेनगर येवलेवाडी, व्हीआयटी कॉलेज रोड, कोंढवा यादी ठिकाणी मंगळवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची त्रेधा उडाली होती.

कामे होऊनही होईना पाण्याचा निचरा

दरवर्षी शहरात पाणी साठणार्‍या ठिकाणांची यादी महापालिका प्रशासन तयार करते. या जागांवर उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेमार्फत करण्यात आल्या होत्या.

वॉर्डस्तरावर देखील उपाययोजना करण्याच्या सूचना

आहेत. शिवाय महापालिका प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी पाहणी व सर्व्हे करून पाणी साठणार्‍या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टिकोनातून कामे करण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा अनेक ठिकाणी पाणी साठल्याचे पाहायला मिळाले.

पूरस्थिती नियंत्रणासाठी पुण्याला 250 कोटी मंजूर

शहरी पुराचा धोका कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनांतर्गत निधीचे वाटप केले आहे. हा निधी मिळविण्यासाठी देशातील 7 शहरांची निवड करण्यात आली होती. त्यात पुणे शहराचाही समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पुणे शहरासाठी पाच वर्षांसाठी 250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या निधीतून पूर नियंत्रणासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत. मात्र, कामे करून देखील पाणी तुंबण्याचे प्रकार सुरूच आहेत.

कामासाठी वाहतूक पोलिसांकडून मिळेना ‘एनओसी’

शहरातील कोंढवा येवलेवाडी येथील गोकूळनगर चौक, हडपसरमधील वैभव थिएटर कॉर्नर, स्वारगेट चौक, बिबवेवाडी रस्त्यावरील पुष्प मंगल कार्यालय आणि आळंदी रस्त्यावरील कळस फाटा या पाच ठिकाणी पावसाळी लाइन टाकण्यासाठी पोलिसांकडून परवानगी (एनओसी) दिली जात नाही, त्यामुळे येथील कामे रखडली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT