पुणे: शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहून गळती रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून राबवल्या जाणाऱ्या ‘24 बाय 7’ पाणीपुरवठा योजनेलाच आता पाणीचोरांनी लक्ष्य केले आहे. धायरी परिसरातील रायकर मळा येथे गुरुवारी मध्यरात्री मुख्य जलवाहिनीलाच प्लंबरच्या मदतीने छिद्र पाडून अनधिकृत नळजोडणी (पाणीचोरी) घेण्याचा प्रकार उघडकीस आला. ही जोडणी करताना मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले.
हा गंभीर प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीस आला. सकाळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आल्यावर त्यांनी पाणीगळती रोखली. मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मुख्य पाइपलाइनवर अनधिकृत कनेक्शन घेण्याची ही घटना गंभीर आहे. यासाठी चक्क व्यावसायिक प्लंबरचा वापरला. मात्र, पाणीचोरी करताना अचानक पाइपलाइन फुटल्याने चोरांची तारांबळ उडाली आणि ते प्लंबिंगचे साहित्य घटनास्थळीच टाकून पसार झाले.
महापालिकेचा ढिसाळ कारभार; अनधिकृत नळजोडणीचा पत्ताच नाही!
शहरात 24 तास समान पाणीपुरवठा व्हावा म्हणून संपूर्ण पुण्यात जलवाहिन्यांचे जाळे आणि पाण्याच्या टाक्या उभारण्याचे काम ‘24 बाय 7’ योजनेअंतर्गत युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या योजनेच्या मुख्य जलवाहिन्या सुरक्षित आहेत का? असा प्रश्न या घटनेने उपस्थित केला आहे. शहरात असे किती अनधिकृत नळजोड आहेत, याबाबत महानगरपालिकडे माहिती नाही.
काळूबाई मंदिर रायकर मळा परिसरात काही जण चोरून पाण्याचे कनेक्शन घेत होते. माहिती मिळताच घटनास्थळी गेलो. मात्र संबंधित लोक पळून गेले. याबाबत सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाला कळविले. अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.संभाजी पुरी, खडकवासला युवासेना विभागप्रमुख
मुख्य जलवाहिनीला भगदाड पाडून नळजोड घेणे ही अतिशय गंभीर घटना असून, याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. तसेच या परिसरातील अधिकृत व अनधिकृत दोन्ही नळजोडण्यांची तपासणी केली जाणार आहे.नंदकुमार जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी 24 बाय 7 च्या जलवाहिनीला छिद्र पाडून अनधिकृत नळजोड घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आढळले. ही घटना गंभीर असल्याने या परिसरातील सर्व नळजोड यांची पाहणी करून कारवाई केली जाणार आहे.सुहास महेंद्रकर, उप अभियंता.