पुणे: निवडणुकीसाठीच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्यात आल्यानंतर आता प्रशासनाकडून निवडणुकीसाठीच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी वेगवेगळ्या तब्बल 23 कक्षांची स्थापना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या कक्षांच्या जबाबदारीसाठी अधिकारीही नियुक्त करण्यात आले असून, त्यांनी तत्काळ कामाला सुरुवात करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता दि. 31 जानेवारी आधी महापालिका निवडणुका होणार आहेत. साधारणपणे दि. 15 डिसेंबरच्या आसपास या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने आता निवडणुकीसाठी पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. (Latest Pune News)
त्यानुसार निवडणुकीच्या कामकाजानुसार 23 कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षांमध्ये निवडणूक कर्मचारी व व्यवस्थापन कक्ष, मतदान केंद्र सुविधा कक्ष, थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र कक्ष, मतमोजणी कक्ष अशा वेगवेगळ्या कक्षांचा समावेश आहे. या कक्षांच्या कामकाजासाठी नेमत आलेल्या या अधिकाऱ्यांच्या सेवाही अधिग््राहित करण्यात आल्या आहे.
या कक्षांनी वेगवेगळ्या टप्प्यांत करण्यात आलेल्या कामांचा अहवाल महापालिका आयुक्तांना तत्काळ सादर करायचा आहे, तसेच कक्षासाठी कर्मचारी कक्ष प्रमुखांनी उपलब्ध करून घ्यायचे आहेत. या कोणत्याही कक्ष प्रमुखांनी थेट निवडणूक आयोग अथवा राज्यशासनाशी संपर्क न साधता उपायुक्त निवडणूक यांच्यामार्फतच संपर्क साधायचा आहे, तसेच निवडणूक संपेपर्यंत ही जबाबदारी संबधितांवर असणार आहे.
स्थापन करण्यात आलेले कक्ष
निवडणूक कर्मचारी व व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका व्यवस्थापन, थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र, मतदान व मतमोजणी, मतदान केंद्र व सोयी-सुविधा, स्टेशनरी, साहित्य वितरण, माहिती व जनसंपर्क, दूरसंचार सुविधा, बैठकांचे आयोजन, आचारसंहिता, विद्युत व्यवस्थापन, माहिती व तंत्रज्ञान, ई. व्ही. एम व्यवस्थापन, समन्वय, निवडणूक खर्च, विधी, आरोग्य, पाणीपुरवठा व्यवस्थापन, विद्रूपीकरण कारवाई, पेड न्यूज, वाहतूक व्यवस्थापन, सभामंडप परवानगी याप्रमाणे होय.