पुणे

सणसर कटमधून 22 गावांना पाणी मिळावे : हर्षवर्धन पाटील

अमृता चौगुले

बावडा : पुढारी वृत्तसेवा :  खडकवासला कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांमधील शेतीला मिळावे म्हणून सणसर कटची 30 कोटी रुपये खर्च करून निर्मिती करण्यात आली. मात्र, त्यामधून 22 गावांच्या शेतीला खडकवासलाच्या पाण्याचा अद्यापि एक थेंबही मिळालेला नाही. त्यामुळे सणसर कटमधून 22 गावांच्या शेतीला खडकवासलाचे 4 टीएमसी पाणी मिळावे, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी सांगितले. निरवांगी नजीक दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांनी पूजा करून दर्शन घेतले.

त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पुणे येथे शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मी ही मागणी लावून धरली आहे. भाटघरचे 4 टीएमसी पाणी कमी करून ते खडकवासलातून 22 गावांना देण्याची व्यवस्था सणसर कट म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे सणसर कटमधून 22 गावांमधील शेतीला हक्काचे 4 टीएमसी पाणी मिळाले पाहिजे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. मी सत्तेवर असताना पाठपुरावा करून 22 गावांना 7 नंबर फॉर्मवर पाणी मिळवून दिले आहे. गेल्या 9 वर्षांत 22 गावांमध्ये शेतीला पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. याला जबाबदार कोण? असा सवालही हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला. निरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

तसेच निरा नदीवर बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षण होणार आहे. नंदिकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी 30 लाख रुपये निधी मी जाहीर केला असून, त्यामध्ये एक रुपयाही कमी होणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. या वेळी निरा-भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, प्रदीप पाटील, उदयसिंह पाटील तसेच कर्मयोगी व निरा-भीमा कारखान्याचे संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT