पुणे

Pune Police News : पोलिसांसाठी पुण्यात होणार 22 मजली इमारती

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी शिवाजीनगर येथे 22 मजली दहा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये अधिकार्‍यांसाठी दोन, तर कर्मचार्‍यांसाठी आठ इमारती असणार आहेत. त्यापैकी दोन इमारतींचे बांधकाम एका खासगी व्यक्तीने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून स्वखर्चाने पूर्ण करून दिले आहे. तर इतर इमारतींचे काम राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पंधरा वर्षांपूर्वी येरवडा येथील पोलिस ठाण्यालगतची तीन एकर जागा खासगी व्यावसायिकाच्या मदतीने विकसित करण्याचा प्रस्ताव होता. त्यावरूनच सध्या पालकमंत्री अजित पवार आणि तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्यातील वाद रंगला आहे. येरवड्याला पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यात येणार नसली, तरी शिवाजीनगरला मात्र त्यांच्यासाठी भव्य इमारती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. शहरातील विविध भागांत पोलिसांची 2 हजार 983 निवासस्थाने आहेत. त्यामध्ये अधिकार्‍यांची 225 आणि कर्मचार्‍यांची 2 हजार 758 निवासस्थाने आहेत. त्यापैकी 991 निवासस्थाने रिक्त आहेत. तर, नव्याने 672 निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत.

शहरात पोलिसांसाठी स्वारगेट, खडक, सोमवार पेठ, बॉडीगेट औंध, शिवाजीगनर, गोखलेनगर यांसह इतर ठिकाणी पोलिस वसाहती आहेत. काही ठिकाणी बैठ्या चाळी, तर काही ठिकाणी इमारती आहेत. त्यातील अनेक वसाहतींची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे तब्बल एक हजार निवासस्थाने रिक्त आहेत. आठ इमारतींचीच्या कामाबाबत कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्याचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनीदेखील वेळोवेळी आढावा घेतला असून, संबंधित प्रशासकीय विभागांना काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

निवासस्थानांची दयनीय स्थिती

पोलिस वसाहतीतील जुन्या घरांची तुलना काडीपेटीच्या आकाराशी केली जाते. यामुळे अनेक कर्मचारी भाड्याने घरे घेऊन राहत असल्याचे देखील वास्तव आहे. तर, दुसरीकडे निवास्थाने रिकामी असल्यामुळे बाहेर खासगी घरे घेऊन राहणार्‍या कर्मचार्‍यांना घरभाडे मिळत नाही. जी निवास्थाने रिकामी आहेत. त्यांची अवस्था अतिशय खराब आहेत. त्यातील अनेक वसाहती बि—टिशकालीन आहेत. कर्मचार्‍यांसाठीच्या घरांंचे क्षेत्रफळ दोनशे ते दोनशे सत्तर चौरस फुटांच्या आसपास आहे. त्या घरांची वारंवार दुरुस्ती करूनदेखील काही सुधारणा होत नाही. शिवाजीनगर येथे नव्याने होणार्‍या आठ इमारतींचा प्रश्न जर लवकर मार्गी लागला, तर पोलिसांसाठी ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT