जुन्नर : जुन्नर वन विभागाच्या राखीव वनक्षेत्रामध्ये शिकारीच्या उद्देशाने आलेल्या 21 जणांना शिकारीसाठी आणलेले साहित्य तसेच 10 दुचाकींसह वन विभागाने ताब्यात घेतल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये सुराळे (ता. जुन्नर) येथील 15, हडसर (ता. जुन्नर) येथील 4 तसेच तेजूर व मांगनेवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 13) हडसर (ता. जुन्नर) येथील राखीव वनक्षेत्रामध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती मोठ्या संख्येने संशयास्पदरीत्या फिरत असल्याबाबतची माहिती वनरक्षक एकनाथ बांगर यांना मिळाली. त्यांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांना कळवली. वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांनी घटनास्थळी अतिरिक्त मनुष्यबळ पाठवून वन्यप्राण्यांच्या शिकारीकरिता आणलेल्या 21 जणांना त्यांनी आणलेल्या एकूण 21 वाघर, 10 दुचाकी वाहनांसह घटनास्थळी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, नीलेश मच्छिंद्र केदारी, रमेश ज्ञानेश्वर केदारी, प्रदीप किसन केदारी व किसन केशव भले हे तपासकामामध्ये सहकार्य करीत नसल्याने व दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने त्यांना मंगळवारी (दि. 13) सायंकाळी अटक करण्यात येऊन त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने वरील चारही आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील अन्य 17 आरोपींनी गुन्ह्याबाबतची कबुली दिली असून, त्यांना बंधपत्रावर मुक्त करण्यात आले.
ही कारवाई जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस, अमृत शिंदे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने केली.
वन्यप्राण्यांना त्यांच्या अधिवासातून पळवून लावणे, त्यांचे शिकारीकरिता फासकी/वाघर लावणे, त्यांची शिकार करणे आदी कृत्ये वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9 चे उल्लंघन आहे. या उल्लंघनाकरिता जास्तीत जास्त 7 वर्षे कारावासाची तसेच 25 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. संबंधित गुन्हा हा अजामीनपात्र तसेच दखलपात्र स्वरूपाचा आहे. यापुढे वन्यप्राण्यांची शिकार करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर