सासवड: पुरंदर तालुक्यातील पोपट नारायण अगिवले (रा. बांदलवाडी गराडे, ता. पुरंदर) यांच्या शेतातील कांद्याच्या बराखीत माथेफिरूने युरिया टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सुमारे 200 गोण्या कांदा सडल्याने अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अगिवले यांनी नाइलाजाने हा सडलेला कांदा टाकून दिला.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गराडे बांदलवाडीचे शेतकरी पोपट अगिवले यांनी आपल्या शेतामध्ये कांदा साठवण्यासाठी नवीन बराख तयार करून हवा खेळत राहावी यासाठी बराखीला लोखंडी जाळी लावली होती. बराखीत साठवलेल्या कांद्याला मोकळी हवा मिळत असल्याने चार महिन्यांपूर्वी साठवलेला कांदा चांगल्या स्थितीमध्ये होता. (Latest Pune News)
अगिवले यांनी त्यांच्या शेतातील बराखीत 4 महिन्यांपूर्वी कांदा साठवला होता. शनिवारी (दि. 23) सकाळी ते बराखीकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना बराखीतून पाणी वाहत असल्याचे दिसले. त्यांनी आत पाहणी केली असता कांद्यात युरिया टाकल्याचे आढळून आले. त्यामुळे बहुतांश कांदा सडून गेला होता.
एकूण 200 पिशव्यांपैकी केवळ 20 पिशव्यांतील कांदा वापरण्यायोग्य असल्याचे दिसून आले, तर उर्वरित संपूर्ण कांदा फेकून द्यावा लागला. या प्रकारामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित घटनेची तपासणी व दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.