दत्तात्रय नलावडे
वेल्हे: दळणवळणाच्या साधनांअभावी तोरणागडाच्या पायथ्याच्या धानेप येथील गुंजवणी धरणखोर्यातील घेवंडे व गेळघाणी गाव तसेच डोंगरमाथ्यावरील वाड्या-वस्त्यांचा बाह्य जगाशी संपर्क तुटला आहे. धरणग्रस्तांसह धनगर समाज, दलित आदिवासी समाजाला जगण्यासाठी दररोज मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. अत्यंत हलाखीमुळे धरणग्रस्त त्रस्त आहेत, तर दुसरीकडे प्रशासन मात्र सुस्त पडल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
संपर्क तुटण्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला असून, दीड महिन्यापासून 15 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद आहे. तसेच, धरणग्रस्तांचे सरकारी रेशनिंगही बंद आहे. बाजारहाट बंद झाला तसेच रुग्णांना औषधोपचारासाठी 20 ते 25 किलोमीटर अंतराची पायपीट करून न्यावे लागत आहे. (Latest Pune News)
बारमाही रस्ता नसल्याने दरवर्षी पावसाळा सुरू होताच जलसंपदा विभागाच्या वतीने घेवंडे, गेळघाणी व परिसरातील वाड्या-वस्त्यांतील विद्यार्थी, धरणग्रस्त, रहिवाशांसाठी गुंजवणी धरणात घेवंडे ते निवी अशी बोट सुरू केली जाते.
त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निवी गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत ये-जा करता येते तसेच धरणग्रस्त रहिवाशांना रेशन, बाजारहाट करण्यासाठी व आजारी रुग्णांना औषधोपचारासाठी वेल्हे, नसरापूर येथे जाता येते. यंदा 15 मेपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच घेवंडे-निवीचा रस्ता बुडाला. तेव्हापासून धरण खोर्यातील रहिवाशांचा संपर्क तुटला आहे.
धरणाचे काम सुरू झाल्यापासून धरण खोर्यातील घेवंडे, गेळघाणी व परिसरातील वाड्या-वस्त्यांतील धरणग्रस्तांसाठी बारमाही रस्ता तयार करण्याचे काम कागदावरच होते. अखेर कानंद ते घेवंडे रस्त्याचे काम जलसंपदा विभागाने सुरू केले आहे. मात्र, अद्यापही काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे बारमाही वाहतूक बंद आहे.
बोट सुरू करण्यासाठी वारंवार विनंत्या करूनही जलसंपदा विभागाने बोट सुरू केली नाही. दळणवळणाचे साधन नसल्याने दररोज मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. रात्री-अपरात्री आजारी गरोदर महिला, रुग्णांना औषधोपचारासाठी वेल्हे येथे घेऊन जाताना खडतर प्रवास करावा लागत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.- शिवाजीराव कडू, संघटक, मावळा जवान संघटना, तोरणा विभाग
कानंद ते घेवंडे या बारमाही रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देऊनही त्याने धरणग्रस्तांसाठी बोट सुरू केली नाही. त्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला जात आहे. दोन दिवसांत बोट सुरू न केल्यास धरणग्रस्तांची गैरसोय दूर करण्यासाठी जलसंपदा विभागा स्वतः बोट सुरू करणार आहे.- नयन गिरमे, उपअभियंता, गुंजवणी धरण विभाग