Pune News: विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील दोन माजी आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीत योग्य पुनर्वसन झाल्यास हे माजी आमदार पक्षप्रवेश करण्यास तयार असल्याचे समजते. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश दिल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होण्याची भीती असल्याने या माजी आमदारांबाबत अजित पवार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या तीनही विद्यमान आमदारांचा पराभव झाला, तर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार निवडून आला आहे. याउलट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार निवडून आले आहेत.
त्यातच राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता असल्याने आगामी काळात पुणे जिल्ह्यावर अजित पवारांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील पराभूत आमदारांनी आगामी राजकारणाची दिशा पाहून अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांतील प्रत्येकी एका माजी आमदाराचा समावेश आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या दोन्ही माजी आमदारांनी राष्ट्रवादीत येण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, आपले पक्षात योग्य पुनर्वसन व्हावे, अशी या माजी आमदारांची मागणी आहे. त्यासाठी पवारांशी संपर्कही साधला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुनर्वसन की निष्ठावंतांना संधी
संबंधित माजी आमदारांना सोबत घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत फायदा होणार आहे. मात्र, त्यांचे नक्की पुनर्वसन कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्याही तीन विद्यमान आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यात खेड-आळंदीचे दिलीपशेठ मोहिते पाटील, वडगाव शेरीचे सुनील टिंगरे आणि जुन्नरचे अतुल बेनके यांचा समावेश आहे. त्यात मोहिते आणि टिंगरे हे कट्टर अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जातात.
त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन या दोघांनाही पवार यांना ताकद लावावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस व पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून येणार्या पराभूत आमदारांचे पुनर्वसन करायचे की आपल्यासोबत राहिलेल्या आणि निवडणुकीत पराभूत झालेल्यांचे पुनर्वसन करायचे, असा प्रश्न अजित पवार यांच्यासमोर आहे. त्यातच राष्ट्रवादीकडे राज्यपाल नियुक्त एक आणि आमदार राजेश विटेकर यांच्या विजयामुळे रिक्त होणारी एक अशा विधान परिषदेच्या दोनच जागा सद्य:स्थितीला आहेत.
त्यातच विधान परिषदेवर संधी मिळावी, यासाठी पुण्यासह राज्यातील अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांना संधी द्यायची की बाहेरून पक्षप्रवेश करणार्यांची परिषदेवर वर्णी लावायची, असाही प्रश्न पवार यांच्यासमोर असणार आहे.