Superstitions History Pudhari
पुणे

18th Century Ghost Beliefs: अठराव्या शतकात भूतबाधेवर सरकारी तोडगा; मोडी कागदपत्रांतून उलगडा

देवस्थान, भूतवैद्य आणि दंड प्रणालीद्वारे होत असे ‘भूत उतार’; अंधश्रद्धेचे वास्तव समोर

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: अठराव्या शतकात भूतबाधेचा निवाडा करण्यासाठी सरकारकडून देऊळ किंवा पडस्थळाची निवड केली जात असे. एखाद्या व्यक्तीने प्रांत कचेरीत भूतिक उपद्रवाची तक्रार केल्यास ती तक्रार खरी आहे का? कुणामुळे भूतिक उपद्रव होतोय? याची खातरजमा केली जात असे. भूत उतरणाऱ्या भूतवैद्याला एका कामाचा दीड रुपया इतके मानधन सरकारी कचेरीतून त्या काळात दिले जात असे.

मोडी लिपीच्या नोंदींतून त्याच गावातील देवस्थान नेमून दिल्याचे दिसून येते. तिथे जाऊन या गोष्टी खऱ्या किंवा खोट्या आहेत हे पाहिले जात असे. यासाठी भूतवैद्य किंवा खडकर सरकारातून नेमून दिला जात असे. ही कागदपत्रे आजच्या तरुण पिढीला कदाचित रंजक वाटतील. त्यांना हसू येईल. मात्र, शिक्षणाअभावी आपल्या समाजात किती अंधश्रद्धा होत्या हेच या मोडी कागदपत्रांतून समोर येते.

भूत उतरवण्याची अशी होती पद्धत

  • प्रसाद लावणे : नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असलेल्या देवतेस प्रसाद लावत असत.

  • अवसर : जो पुजारी असेल त्याला अवसर येऊन म्हणजेच त्याच्या अंगात देव येऊन भूतिक उपद्रव कुणी केला हे तो सांगत असे.

  • भूतिक उपद्रवाची उकल झाल्यानंतर ज्या व्यक्तीने भुते सोडली असतील त्याला स्थानिक सरकारी कचेरीत बोलावून भूतांची वारावार (उपद्रव) बंद करण्याची ताकीद दिली जात असे.

  • काही रक्कम दंड म्हणून सरकारात घेतली जात असे आणि ज्याला त्रास होत असेल त्याच्याकडून नजर म्हणजेच भेट म्हणून काही रक्कम सरकारात घेत असत.

  • जर भुते सोडणाऱ्याने वारावार केली (उपद्रव कमी केला नाही) तर सरकारातून भूतवैद्य नेमून त्रासाचे निवारण करवून दिले जात असे. यासाठी भूतवैद्यालाही मेहेनताना म्हणून काही रक्कम मिळत असे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT