काश्मीरमधून परतलेल्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; 183 पर्यटकांनी मोफत विमानाच्या व्यवस्थेमुळे मानले आभार File Photo
पुणे

काश्मीरमधून परतलेल्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; 183 पर्यटकांनी मोफत विमानाच्या व्यवस्थेमुळे मानले आभार

183 पर्यटक प्रवासी गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुंबई विमानतळावर उतरले.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: काश्मीरमधून मुंबई विमानतळावर पोहचलो. खूपच बरे वाटले. काश्मीरमध्ये भीतीच्या वातावरणात आम्ही अडकून पडलो होतो. कधी एकदा पुण्यात येतो, असे झाले होते. मुंबई विमानतळावर पोहचल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. शासनाने आमच्यासाठी केलेली ही व्यवस्था खूपच चांगली होती. शासनाचे खूप खूप आभार, असे सांगत होत्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पुण्यातील पर्यटक ज्योती झुरुंगे म्हणाल्या.

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी शासनाकडून विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली होती. या विशेष विमानाने तब्बल 183 पर्यटक प्रवासी गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुंबई विमानतळावर उतरले. या वेळी दै. ‘पुढारी’च्या वतीने त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.

त्यावेळी त्यांना तेथे आलेल्या समस्यांची माहिती घेण्यात आली. यासोबतच विशेष विमानसेवेमध्ये त्यांना काय, काय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, याचीही माहिती घेण्यात आली. या वेळी सरकारने मोफत विमानसेवा उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटकांनी शासनाचे आणि मंत्र्यांचे आभार मानले.

ज्योती झुरुंगे म्हणाल्या, माझ्यासह आमचा 70 जणांचा ग्रुप गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास श्रीनगरहून विशेष विमानात बसला अन् मुंबई विमानतळावर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उतरलो. प्रवासादरम्यान शासनाकडून आमची चहा, नाष्टा यांसह अन्य सर्व सुविधा देण्यात आल्या. येताना आम्हाला कोणताही त्रास झाला नाही. शासनाचे खूप खूप आभार.

काश्मीर भारताचे नंदनवन पाहण्यासाठी आलो होतो. परंतु, दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला पर्यटन अर्धवट सोडून माघारी परतावे लागले. स्थानिक नागरिक, पोलिस, राजकारणी यांच्या पाठपुराव्यामुळे आम्ही सुखरूप पुण्यात परतलो. हल्ला झाल्यानंतर काश्मीर नागरिकांच्या रोजगाराच्या प्रश्नावरून आमचा चालक आमच्या जवळ ओक्साबोक्सी रडू लागला. त्याला आम्ही धीर दिला. श्रीनगर ते दिल्ली बस प्रवासादरम्यान नागरीक पाण्याच्या बाटल्या देत तुम्ही सुरक्षित आहात, असा दिलासा देत होते.
- प्रिया व चेतन पवार, प्रवासी
श्रीनगरमधील हॉटेलपासून श्रीनगर एअरपोर्टपर्यंतचा प्रवाश भीतीदायक होता. पोलिसांच्या वेशात दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे काय होईल, याची शाश्वती नव्हती. मात्र, स्थानिक नागरिक, पोलिस व मिलिटरीने सुरक्षितरीत्या श्रीनगर विमानतळावर पोहचविले. विमानतळावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. ज्या व्यक्तींना प्रवासात काही मिळाले नाही, त्यांच्यासाठी विमानतळावर नाष्टा-पाण्याची व्यवस्था केली होती. दुपारी एक वाजता श्रीनगर सोडल्यानंतर साडेचार वाजता श्रीनगर विमानतळावर पोहचलो. तेथून नऊ वाजता दिल्ली व त्यानंतर रात्री सव्वाअकराच्या सुमारास पुण्यात सुखरूप पोहोचलो.
- मनीषा कावेडिया, प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT