चाकण: चाकण एमआयडीसीतील महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील कंपन्यांमधून सोडलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे 18 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 1) सायंकाळी 4:30 वाजता एच. पी. चौकातील हॉटेल कोर्टयार्डच्या मागील मोकळ्या जागेत घडली.
या प्रकरणात बाळू दामु कोकरे (वय 40, सध्या रा. एच. पी. चौक, महाळुंगे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हॉटेल कोर्टयार्डच्या मागे असलेल्या कंपन्यांच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी मेंढ्या चारत असताना, कंपन्यांमधून नाल्यात सोडलेले दूषित सांडपाणी 18 मेंढ्यांनी प्यायले. त्यामुळे त्यांच्या नाका-तोंडातून फेस आणि पाणी येऊन त्यांचा मृत्यू झाला. कंपनी प्रशासनाला याची जाणीव असतानाही त्यांनी हे दूषित पाणी बाहेर सोडले, ज्यामुळे सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले, असे फिर्यादीने म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, खेड तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामे करून तेथील पाण्याचे गवताचे नमुने घेतले आहेत. मृत मेंढ्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याचे पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.