पुणे

पिंपरी : रस्त्यांच्या खोदकामासाठी 18 कोटी; पालिकेचे सीसीटीव्हीचे नवीन काम

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सुस्थितीतील चांगले रस्ते व पदपथ खोदण्यात आले आहेत. आता नव्याने लावण्यात येणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसाठी तब्बल 50 किलोमीटर अंतराचे रस्ते व पदपथ खोदण्यात येणार आहेत. केवळ खोदकाम आणि खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी 17 कोटी 50 लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

स्मार्ट सिटी कंपनीचे फायबर केबल नेटवर्कचे काम करणार्‍या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीने महापालिकेच्या 50 किलोमीटर अंतराच्या केबल डक्ट टाकण्याच्या कामास परवानगी द्यावी, अशी मागणी 5 सप्टेंबर 2022 ला केली होती. स्मार्ट सिटीच्या ई अ‍ॅण्ड वाय या सल्लागार संस्थेने हे काम करणे स्मार्ट सिटी व महापालिकेसाठी गरजेचे असल्याचे म्हटले आहे. हे काम लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीकडून करून घ्यायचे ठरल्यास 16 कोटी 90 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

सीसीटीव्ही यंत्रणेचे हे काम शेवटच्या टप्प्यातील आहे. ते काम पूर्ण झाल्याशिवाय उर्वरित पीसीएमसी सर्व्हलन्स कॅमेरा व स्मार्ट इलेमेंट्स निगडी येथील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरला लाईव्ह दृश्य दिसणार नाहीत. त्यामुळे शहराचा संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित होणार नाही, असे सल्लागार संस्थेचे मत आहे.

लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीस हे काम न देता त्याची निविदा काढण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात त्या कामासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. सीसीटीव्ही सर्व्हलन्स यंत्रणा उभारण्याच्या नवीन प्रकल्पासाठी 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्पात 54 कोटी 99 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद आहे. त्यापैकी 5 कोटीचा निधीची कमी करून ती रक्कम पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी ओएफसी केबल व डक्ट टाकणे व खोदलेला रस्ता पूर्ववत करणे या विशेष योजनेसाठी वळविण्यात आली आहे. नव्या कामास 17 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चास सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता आयुक्तांनी नुकतीच दिली आहे.

661 किलोमीटर भूमिगत केबल

स्मार्ट सिटी कंपनीने भूमिगत सिटी फायबर नेटवर्क केबल टाकण्याचे काम लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एल अ‍ॅण्ड टी) लिमिटेड या कंपनीस 26 फेब्रुवारी 2029 ला दिले. या कामात फायबर केबल टाकणे, सीसीटीव्ही, वायफाय व आयटीएमसी पोल बसविणे, व्हीएमडी युनिपोल बसविणे, त्यासाठी केबल जोड देणे आदींचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात एकूण 561.902 किलोमीटर अंतराची भूमिगत केबल टाकली आहे. खोदलेले रस्ते व पदपथ पूर्ववत केले. या कामासोबत महापालिकेच्या वतीने उभारलेल्या सीसीटीव्ही यंत्रणा जोडणीचे काम संबंधित कंपनीस देण्यास स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 17 नोव्हेंबर 2021 ला मान्यता दिली होती.

सीसीटीव्ही यंत्रणेचे महापालिकेचे नवे काम

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही व केबल नेवटर्कचे काम पूर्ण झाले आहे. आता महापालिका शहरातील वेगवेगळ्या भागात सीसीटीव्ही यंत्रणा उभारत आहे. त्यासाठी 50 किलोमीटर अंतर केबल टाकण्यासाठी रस्ते खोदकाम व ते पूर्ववत करण्याचे काम आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. त्याची लवकरच निविदा काढून काम केले जाईल, असे महापालिकेच्या स्थापत्य उद्यान व क्रीडा विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT