Extra buses and trains for Konkan travelers
पुणे: यंदाच्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून कोकणासाठी 170 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या पुणे, पिंपरी आणि तळेगाव आगारातून धावणार आहेत. यामुळे गणेशोत्सवादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी आणि गैरसोय टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे कोकणात जाणार्या कोकणवासियांना ओढ लागते, ती आपल्या गावी जाण्याची, गणेशोत्सवासोबतच कोकणात होळीचा सणदेखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दोन्ही सणांच्या दिवशी मुंबई, पुण्यात कामधंद्यासाठी गेलेले कोकणवासिय आवर्जून सुट्ट्या काढून आपल्या गावी कोकणात जातात. (Latest Pune News)
त्यामुळे या सणांच्या काळात रेल्वे आणि एसटी गाड्यांना मोठी गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या पुणे विभागाने गणेशोत्सवानिमित्त नियोजित गाड्यांव्यतिरिक्त 170 जादा गाड्या कोकण भागातील प्रवाशांसाठी सोडल्या आहेत.
रेल्वेच्या 12 विशेष फेर्या
मध्य रेल्वे रेल्वेच्या पुणे विभागाकडून कोकणात जाणार्या भाविकांसाठी सहा विशेष जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्यांच्या पुणे-रत्नागिरी-पुणेदरम्यान एकूण 12 फेर्या होणार आहेत. यामुळे रेल्वेने कोकणात ये-जा करणार्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात गावी जाणार्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे दरवर्षी मध्य रेल्वेकडून गणेशभक्तांसाठी जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही कोकणवासियांसाठी मध्य रेल्वे पुणे विभागाने जादा गाड्या सोडल्या आहेत. पुणे विभागातून नियोजित गाड्यांव्यतिरिक्त सहा विशेष गाड्या धावणार आहेत. त्यांच्या प्रत्येकी दोन म्हणजेच एकूण 12 फेर्या होणार आहेत. यागाड्यांद्वारे पुणे-रत्नागिरीदरम्यान कोकणवासियांना प्रवास करतायेणार आहे.
याबाबत मध्य रेल्वे पुणे विभागाचे विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा म्हणाले, दिनांक 23 ऑगस्टपासून आम्ही गणेशोत्सव गाड्या सोडायला सुरूवात केली आहे. दि. 23, 26 आणि 30 रोजी तीन विशेष गाड्या धावतील यांच्या प्रत्येकी सहा फेर्या होतील. तसेच, दि. 2, 6 आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी सहा फेर्या पुणे-रत्नागिरी-पुणे दरम्यान होतील, अशा एकूण 12 फेर्या गणेशोत्सव स्पेशल गाड्यांच्या होणार आहेत. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.
आम्ही वर्षभर या सणाची वाट बघतो. पण गावी जाण्यासाठी नेहमीच तिकीट मिळण्याची चिंता असते. एसटीने ज्यादा गाड्या सोडल्यामुळे आमचा प्रवास खूप सोयीचा होईल. आता आम्ही आमच्या कुटुंबासोबत आनंदात गणेशोत्सव साजरा करू. एसटीने घेतलेला हा निर्णय कोकणवासियांसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे.- श्रेयस शेडगे, कोकण भागातील रहिवासी
गणेशोत्सवात कोकणात जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे आम्ही दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करतो. यंदाही पुणे विभागातून 170 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्या स्वारगेट, पिंपरी आणि तळेगाव आगारातून उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, मुंबई आणि ठाणे विभागाच्या मागणीनुसार, त्यांना 230 गाड्या पुरवण्यात आल्या आहेत. गरज पडल्यास आणखी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील.- कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग