तळेगाव दाभाडे हद्दीत 162 इमारती धोकादायक; नगर परिषदेने बजावल्या नोटिसा Pudhari
पुणे

Dangerous Buildings: तळेगाव दाभाडे हद्दीत 162 इमारती धोकादायक; नगर परिषदेने बजावल्या नोटिसा

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत 162 इमारती धोकादायक असल्याचे नगरविकास विभागाने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. या इमारती जीर्ण झाल्या असून, मोडकळीस आल्या आहेत. त्यापासून जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने त्या ताबडतोब काढून टाकण्याबाबत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी संबंधित घरमालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना

त्यापैकी तातडीने रिकाम्या करावी लागणारी काही घरे आहेत. इतरत्र घर मिळेपर्यंत गरजूंसाठी प्रशासनाने नगर परिषदेच्या सुभाष मार्केट, शिवाजी टॉकीजजवळील रिकाम्या इमारतीत व्यवस्था केली आहे.  (Latest Pune News)

नगररचना विभागाने गेल्या महिन्यात शहर परिसरातील इमारतींची बाह्य पाहणी केली. त्यात 162 घरे आणि इमारतींची दुरवस्था झाली असल्याचे निदर्शनास आले. भिंती कमकुवत होणे, मोडकळीस येणे, पाया खचने, छताचा आधार कमकुवत होऊन ते तिरके होणे यामुळे त्या कधीही पडण्याचा धोका असल्याचे पाहणीत आढळल्याचे सहायक नगर रचनाकार विश्वजित कदम यांनी सांगितले. याबाबतच्या अहवालाची दखल मुख्याधिकारी सरनाईक यांनी तातडीने घेत त्या रिकाम्या करणे आणि स्ट्रक्चरलऑडिट करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

आजूबाजूच्या रहिवाशांच्या जीवाला धोका

मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये 70 ते 100 वर्ष जुन्या इमारतींची संख्या सर्वांधिक आहे. मूळ गावठाणात तसेच वस्त्यांमध्ये असलेल्या या बैठ्या निवासी घरांमध्ये अजूनही नागरिक राहत आहेत. महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 195 नुसार वापरात असलेली मिळकत काढून टाकण्यासाठी बजावले आहे.

बांधकाम धोकादायक झाल्याचे निर्देशनास आले आहे. या मिळकत बांधकामामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना धोका व वित्तहानी होऊ शकते, असा दावा केला आहे. त्यामुळे या इमारत बांधकाम मोकळे करुन त्वरित उतरवून घ्यावे. या इमारत बांधकामामुळे आजुबाजूच्या रहिवाशांना धोका अथवा अपाय झाल्यास तसेच ाया ठिकाणी काही जीवित वा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी घरमालकांची असेल, असा स्पष्ट उल्लेख केला आहे.

इमारतींवर धोक्याची सूचना दर्शविणारे लावले फलक

त्याबाबतच्या कोणत्याही नुकसानीस नगर परिषद जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी अथवा इमारत धोकादायक नसलेबाबत नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचेकडील स्ट्रक्चरल ऑडीट सादर करावे, असे म्हटले आहे. शुक्रवारपासून (दि.19) अशा सर्व इमारतींवर धोक्याची सूचना दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत.

नगर परिषदेच्या भुजबळ हॉल इमारतीची पडझड

नगर परिषद मालकीच्या भुजबळ हॉल ही इमारत गेल्या 20 वर्षांपासून शेवटची घटका मोजत आहे. त्या इमारतीची इतकी पडझड झाली आहे, की तिचे ऑडिट न करता ती जागा रिकामी केली पाहिजे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मात्र, गेल्या दोन दशकांत ती पूर्ण करण्यासाठी एकाही लोकप्रतिनिधीला नेटाने प्रयत्न करून हे काम फत्ते करता आले नाही. नगर परिषदेच्या मालकीचे हे पहिले आणि एकमेव सांस्कृतिक सभागृह होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT