पुणे: केंद्र सरकारच्या विण्ड्स (वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डाटा सिस्टिम) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र सुरु करण्यात येत असून हवामानविषयक अचूक माहिती संकलित होऊन शेतकर्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
त्यानुसार पुणे जिल्ह्यात एकूण 1390 ग्रामपंचायतीमध्ये हे केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. केंद्र व राज्यसरकारच्या संयुक्त निधीतून या प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. (Latest Pune News)
स्वंयचलित हवामान केंद्राच्या या प्रकल्पाचा कालावधी पाच वषाचार्र् असून त्यास दोन वर्षापर्यंत मुदतवाढ देता येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करुन दयावयाची आहे. तसेच ही जागा शासकीय असणे आवश्यक असून प्रकल्पातंर्गत ग्रामपंचायत स्तरावर हे केंद्र बसविण्याकरिता तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध करुन देणे आवश्यक असून याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व जिल्हाधिकार्यांना पत्राद्वारे पाठविल्या आहेत.
ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राकरिता जागा निवडीची कार्यपध्दती ठरवून देण्यात आली आहे. तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष तहसिलदार असून गट विकास अधिकारी व एक निमंत्रित सदस्य तसेच तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जुन्या योजनेतून पुणे जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय यापुर्वीच 128 हवामान केंद्रे कार्यान्वित होती.
खेड, भोरमध्ये सर्वाधिक संख्या
महावेध प्रकल्पातंर्गत पुणे जिल्ह्यात तालुकानिहाय स्वयंचलित हवामान केंद्र ग्रामपंचायतीमध्ये जागा निश्चित करुन सुरु करण्यात येत आहे. त्यामध्ये तालुकानिहाय संख्येनुसार खेड 162, भोर 156, हवेली 71, मुळशी 95, मावळ 103, वेल्हे 71, जुन्नर 144, आंबेगांव 103, शिरुर 96, बारामती 99, इंदापुर 116, दौंड 81, पुरंदर 93 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.