पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल याच आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. मंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या मंगळवारी (दि. 21) किंवा परवा बुधवारी (दि. 22) बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बारावीच्या निकालाची वाट पाहणार्या विद्यार्थ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये थेट निकालच पाहायला मिळणार आहे.
राज्य मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. दहावी- बारावीची परीक्षा झाल्यानंतर राज्य मंडळाने यंदा वेगवान पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणीचे तसेच उत्तरपत्रिका गोळा करण्याचे काम करून घेतले. आता निकालाची अंतिम तयारी झाली असून, विद्यार्थ्यांना निकाल घरबसल्या पाहता यावा म्हणून पाच ते सहा संकेतस्थळे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. बारावीचा निकाल 21 किंवा 22 मे रोजी जाहीर करण्याची तयारी राज्य मंडळाने केली आहे.
मंडळाने या वर्षी 1 ते 26 मार्च 2024 या कालावधीत दहावीच्या परीक्षा घेतल्या, तर बारावीच्या परीक्षा 1 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत पार पडल्या. बारावी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दहावीसाठी 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी संख्या आणि इतर माहितीचा तपशील राज्य मंडळाकडून निकालासोबत जाहीर करण्यात येणार आहे.
दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलैमध्ये लगेचच घेतली जाते. निकालापासून एक ते दीड महिना त्यांना अभ्यासासाठी मिळतो. पुरवणी परीक्षेचा निकाल काही दिवसांतच जाहीर केला जातो. या परीक्षेला फार विद्यार्थी नसतात. दरम्यान, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांनाही त्याच वर्षी पुढचे शिक्षण घेता यावे म्हणून पुरवणी परीक्षा घेण्यात येते आणि या माध्यमातून दहावी- बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची संधी राज्य मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येत असते.
हेही वाचा