पुणे

पुणे : ‘पिफ’ महोत्सवात मिळणार 120 चित्रपटांची पर्वणी; नावनोंदणीला सुरुवात

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

यंदा 20 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) 3 ते 10 मार्चदरम्यान रंगणार आहे. देश-विदेशातील दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार असून, विविध देशांमधील जवळपास 120 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यंदाच्या 'पिफ'ची संकल्पना स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे आणि प्रसिद्ध गीतकार साहीर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीवर आधारित आहे. त्यानुसार महोत्सवात काही विशेष कार्यक्रम करण्यात येणार आहेत, तर यंदाचा महोत्सव गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना समर्पित केल्याची माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीने आयोजित पिफमध्ये यंदा ऑफलाइन-ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने चित्रपट पाहण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळेल. चित्रपटगृहांसह ऑनलाइन माध्यमातून देखील महोत्सव आयोजित केला आहे. ऑनलाइन माध्यमातून होणार्‍या चित्रपट महोत्सवात निवडक 26 चित्रपट दाखवले जातील. पत्रकार परिषदेला पिफच्या आयोजन समितीचे सदस्य रवी गुप्ता, अभिजित रणदिवे, सतीश आळेकर, समर नखाते आणि मकरंद साठे आदी उपस्थित होते. महोत्सवाच्या नावनोंदणीला मंगळवारपासून (दि. 15) सुरुवात होत आहे.

महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणीतून सहभाग घेता येईल. महोत्सवातील चित्रपट सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि औंध येथील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलिस या चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यात येणार आहेत. या तिन्ही ठिकाणी थेट नोंदणी (स्पॉट रजिस्ट्रेशन) 17 फेब्रुवारीपासून सकाळी 11 ते सायंकाळी साडेसात या वेळेत करता येईल. राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाकडून जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करून महोत्सव करण्यात येईल, असेही डॉ. पटेल यांनी सांगितले.

वर्ल्ड कॉम्पिटीशन श्रेणीत निवडलेले चित्रपट

इरेझिंग फ्रँक (हंगेरी), 107 मदर्स (स्लोवाकिया, झेक प्रजासत्ताक, युक्रेन), मैक्साबेल (स्पेन), द एक्झाम (जर्मनी, इराक, कुर्दिस्तान, कतार), प्ले ग्राउंड (बेल्जीयम), फ्रान्स (फ्रान्स), द लेजनिअर (इटली, फ्रान्स), अ‍ॅज फार अ‍ॅज आय कॅन वॉक (सर्बिया, फ्रान्स, बल्गेरिया, लक्झेमबर्ग, लिथुएनिआ), मिरर्स इन द डार्क (झेक प्रजासत्ताक), सबमिशन (पोर्तुगाल, फ्रान्स), जय भीम (भारत), अमिरा (इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया), बिटवीन टू डॉन्स (तुर्कस्तान, रोमेनिया, फ्रान्स, स्पेन) आणि हाऊस अरेस्ट (रशिया) या 14 चित्रपटांचा समावेश आहे.

…म्हणून या वर्षी महोत्सव मार्चमध्ये

दरवर्षी पिफ हा जानेवारी महिन्यात होतो. पण, कोरोनामुळे मागील वर्षी जानेवारीत होणारा महोत्सव पुढे ढकलण्यात आला. तो महोत्सव 4 ते 11 मार्च दरम्यान होणार होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 19 वा पिफ महोत्सव 2 ते 9 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला. पण, 20 वा पिफ हा लागलीच जानेवारीत घेणे शक्य नसल्यामुळे आणि महोत्सवाच्या तयारीसाठी वेळ असावा, यासाठी तो 3 ते 10 मार्च दरम्यान होत आहे, असे रवी गुप्ता यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT