पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता शेवटची फेरी राबवली जाणार आहे. 22 ते 25 सप्टेंबरदरम्यान संबंधित फेरी राबविण्यात येणार आहे. राज्यात अकरावी प्रवेशासाठी आत्तापर्यंत तब्बल 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून प्रवेशासाठी अद्यापही सव्वाआठ लाखांवर जागा रिक्तच राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 548 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 23 हजार 960 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 45 हजार 697 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 69 हजार 657 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 85 हजार 686 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 65 हजार 111 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 68 हजार 782 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 13 लाख 33 हजार 893 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. (Latest Pune News)
आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 58 हजार 849 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 76 हजार 915 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 35 हजार 764 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशासाठी अनेक फेऱ्या राबवूनही विद्यार्थी प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे वारंवार फेऱ्या राबवून देखील यंदा अकरावीची तब्बल सव्वाआठ लाखांहून अधिक बाके रिकामीच राहणार आहेत; परंतु तरीदेखील सुरू असलेले प्रवेश प्रक्रियेचे गुऱ्हाळ नेमके कधी संपणार आहे?असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
असे आहे अंतिम फेरीचे वेळापत्रक
नवीन कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी करणे : 22 सप्टेंबर
कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या इच्छेनुसार (व्यवस्थापन, अल्पसंख्याक) कोट्यातील जागा प्रत्यार्पित करणे : 22 सप्टेंबर
प्रवेश क्षमता वाढविणे : 22 सप्टेंबर
विशेष फेरीअंतर्गत भरलेल्या अर्जात दुरुस्ती करणे तसेच किमान 10 पसंतीक्रम भरणे : 22 ते 23 सप्टेंबर
विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत : 24 आणि 25 सप्टेंबर