Admission Pudhari
पुणे

FYJC Admission Third Round: अकरावी प्रवेश तिसऱ्या फेरीत १.४९ लाख विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

राज्यातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या फेरीला मोठा प्रतिसाद; विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नियमित तिसऱ्या फेरीत १ लाख ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. सर्वाधिक ४२ हजार ५०७ प्रवेश मुंबई विभागात झाले आहेत. तसेच तीन नियमित फेऱ्यांनंतर आता विशेष फेऱ्या राबवल्या जाणार असून, पहिल्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी ३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

तिसऱ्या फेरीत १ लाख ८१ हजार ९३१ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीची मुदत गुरुवारी (२५ जून) संपली. या मुदतीत १ लाख ४९ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यापैकी १ लाख २१ हजार ३२३ विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत पद्धतीने (कॅप), तर २८ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी राखीव कोट्यातून प्रवेश घेतला आहे.

प्रवेशप्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या राबविण्यात आल्या. आता विशेष फेऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार पहिली विशेष फेरी २९ जूनपासून सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना २९ जून ते १ जुलै या कालावधीत नोंदणी, प्रवेश अर्जाच्या भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील.

२ ते ३ जुलैदरम्यान महाविद्यालय वाटप (ॲलॉटमेंट) प्रक्रिया राबवली जाणार आहे. ३ जुलै रोजी दुुपारी ३ वाजता विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३ ते ६ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. ६ जुलै रोजी दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अद्याप १४ लाख ४० हजार १९४ जागा रिक्त

राज्यात यंदा ९ हजार ६६९ महाविद्यालयांत २२ लाख १४ हजार ४०६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी १४ लाख ३७ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत राबवलेल्या तीन विशेष फेऱ्यांतून ७ लाख ७४ हजार २१२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यात ६ लाख ४५ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी केंद्रिभूत (कॅप) पद्धतीने, तर १ लाख २८ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी राखीव कोट्यातून प्रवेश निश्चित केला आहे. तर, अद्याप १४ लाख ४० हजार १९४ जागा रिक्त असल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT