Last date of 11th admission 2025
पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून अद्याप महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी 3 ते 9 सप्टेंबरदरम्यान एक विशेष फेरी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या फेरीतील प्रवेशासाठी आज मंगळवारी (दि. 9) शेवटचा दिवस असणार आहे. राज्यात अकरावी प्रवेशासाठी आत्तापर्यंत तब्बल 13 लाखांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशासाठी अद्यापही साडेआठ लाखांवर जागा रिक्तच राहिल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात नऊ हजार 544 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 22 हजार 298 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच तीन लाख 45 हजार 244 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 67 हजार 542 जागा उपलब्ध आहेत. (Latest Pune News)
त्यासाठी 14 लाख 83 हजार 33 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 47 हजार सहा विद्यार्थ्यांनी कॅपमधून, तर एक लाख 67 हजार 362 विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत अशा 13 लाख 14 हजार 368 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
आता प्रवेशासाठी अद्यापही सहा लाख 75 हजार 292 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच एक लाख 77 हजार 882 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण आठ लाख 53 हजार 174 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. अकरावी प्रवेशासाठी अनेक फेर्या राबवूनही विद्यार्थी प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत.