

पुणे: मागील काही वर्षांत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने या अभ्यासक्रमाच्या फेर्यांमध्ये तीनऐवजी चार असा बदल केला. यंदा चार फेर्यानंतर देखील प्रवेशाच्या जवळपास 60 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.
त्यामुळे उर्वरित जागा संस्थास्तरावरील फेरीत भरण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर असणार आहे. चार फेर्यांअखेर एक लाख 41 हजार 905 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामध्ये यंदा सर्वाधिक पसंती कॉम्प्युटर आणि त्यासंबंधित अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांनी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Pune News)
यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या दोन लाख दोन हजार 638 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंत पार पडलेल्या चार फेर्यांमध्ये जवळपास एक लाख 41 हजार 905 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर 60 हजार 733 जागा अद्यापही रिक्त आहेत. आता या जागांसाठी संस्थात्मक स्तरावर प्रवेश सुरू असून, त्यामध्ये आणखी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे अपेक्षित आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि एआयडीएस, एआयएमएल आदी संगणकाशी संबंधित शाखांकडेच विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सर्वाधिक म्हणजे 22 हजार 955 प्रवेश नोंदविले गेले आहेत. या अभ्यासक्रमासाठी 32 हजार 171 जागा उपलब्ध आहेत.
कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग या शाखेत 19 हजार 860 जागांपैकी 15 हजार 263 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आयटी अभ्यासक्रमासाठी 17 हजार 311 जागांपैकी 12 हजार 520 जागा भरल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डेटा सायन्स आणि मशिन लर्निंग यांसारख्या आधुनिक शाखांनाही चांगला प्रतिसाद दिसत आहे. पारंपरिक शाखांकडे विद्यार्थ्यांचा फारसा कल नसल्याचे चित्र आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 23 हजार 853 जागांपैकी 15 हजार 233 प्रवेश झाले. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 17 हजार 450 जागांपैकी केवळ 10 हजार 939 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 13 हजार 649 पैकी फक्त 8 हजार 714 प्रवेश झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून न जाता योग्य महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.