पुणे: दहावीचा निकाल यंदा वेळेवर जाहीर करीत राज्य मंडळाने सुरुवात चांगली केली. परंतु, त्यानंतरचा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील कारभार पूर्णपणे नियोजनशून्य आणि गोंधळाचा ठरला आहे. वेळापत्रकात सतत बदल, विद्यार्थ्यांना अपूर्ण माहिती, यादीसह वेळापत्रकात बदल, तारखांबाबतचा संभ्रम, यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या गोंधळात आहे.
शालेय शिक्षण विभागाचा अकार्यक्षम कारभार आणि वेळेचे भान न ठेवता घेतल्या जाणार्या निर्णयामुळे प्रवेशाची पारदर्शकताच धोक्यात आली आहे. राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत वेळापत्रकांतील सतत बदलांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. (Latest Pune News)
रविवारी 8 जून रोजी जाहीर करण्यात आलेली शून्य फेरीच्या गुणवत्तायादीचे वेळापत्रक आणि त्यानंतर सुरू होणार्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे.शिक्षण विभागाने अकरावीच्या प्रवेशासाठी काढलेल्या सुरुवातीच्या निर्णयानंतर आत्तापर्यंत वेळापत्रकात तीनवेळा बदल केले आहेत. त्यात इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाच्या तारखांमध्येही दोनवेळा फेरफार करण्यात आला आहे.
शून्य फेरीची गुणवत्तायादी 11 जून रोजी जाहीर होणार असून, 12 ते 14 जूनदरम्यान त्यानुसार प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तथापि, यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकात 10 जूनला पहिली गुणवत्ता यादी (कॅप राउंड) प्रसिद्ध होणार होती. मात्र, आता सुधारित वेळापत्रकानुसार तब्बल 16 दिवसांनी 26 जूनला होणार आहे.
17 जून रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाळा आणि प्रवेश प्रक्रियेचे परीक्षण करण्यात येणार असल्याचे वेळापत्रकात नमूद आहे. मात्र, या अगोदर इतका कालावधी कशासाठी? हा मोठा प्रश्न पालकांपुढे उभा आहे. पहिल्या यादीनंतर 27 जून ते 3 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कॅप राउंडअंतर्गत प्रवेश घ्यायचा असून, दुसर्या फेरीसाठी 5 जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. म्हणजे, पूर्ण जून महिना पहिल्या यादीलाच जाणार आहे.
एका यादीमागोमाग दुसरी यादी आणि त्यानंतर वेळापत्रकात फेरफार, यामुळे विद्यार्थ्यांना योग्य महाविद्यालय मिळेल का? याबाबतही चिंता निर्माण झाली आहे. अन्यथा, अशा प्रक्रियेमुळे गुणवत्ताधारित प्रवेशाच्या उद्देशाला हरताळ फासला जातो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा भाग-1 भरलेला; परंतु भाग-2 न भरलेल्या जवळपास 75 हजार विद्यार्थ्यांना नियमित फेरीमध्ये संधी उपलब्ध व्हावी. यासाठी शिक्षण संचालनालयाने दिलेल्या मुदतवाढीमध्ये अवघ्या 9 हजार विद्यार्थ्यांनी भाग-2 भरले. त्यामुळे भाग-2 भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 11 लाख 38 हजार इतकी झाली आहे.