पुणे : आजपासून आषाढ मास सुरू होत आहे. या मराठी महिन्यात यंदा पाऊस मुबलक पडणार असल्याचे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, यंदाचा पावसाळा गत 33 वर्षांतील दुर्मीळ असून, सर्वच नक्षत्रे भरपूर पाऊस देणारी आहेत. रोहिणी, मृग आणि आर्द्रा नक्षत्रातही धो-धो पाऊस सुरू असल्याने यंदाचा मान्सून विक्रमी पावसाचा ठरणार आहे. या महिन्यात सरासरी 110 टक्के पावसाचा अंदाज आहे.
आषाढ मासाचे सुंदर वर्णन महाकवि कालिदासांच्या ‘मेघदूत’ या महाकाव्यात केले आहे. आचार्य प्र. के. अत्रे यांनीही ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या लेखात आषाढ महिन्याचे मनोहारी वर्णन केले आहे. या महिन्यात सृष्टी हिरवागार शालू नसते, त्यामुुळे आषाढ मास सर्वांना आवडतो. असा महाकवींना आवडणारा आषाढ मास गुरुवारपासून सुरू होत आहे. प्राचीन काळातील पर्जन्यमानाचे अभ्यासक वराह मिहिर यांनी त्यांच्या ग्रंथांतील नोंदीचा अभ्यास करणारे राघवेंद्र गायकैवारी यांच्या मते यंदा शहरात आषाढ सरी जोरदार बरसतील. आषाढ मास 26 जून ते 24 जुलै या कालावधीत आहे. या कालावधीत सुमारे 110 टक्के पाऊस बरसणार असल्याचा अंदाज दिला आहे.
गायकैवारी यांनी सांगितले की, आम्ही ‘वराह मिहिर’ यांच्या ग्रंथाच्या नोंदीनुसार एक मॉडेल तयार केले आहे. त्यानुसार यंदा आषाढात शहर परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात भरघोस पाऊस पडेल. गत 33 वर्षांतील यंदाच्या नोंदी या विक्रमी पावसाच्या आहेत. कारण, घाटमाथ्यावर वैशाख, ज्येष्ठ महिन्यात भरपूर पाऊस झाला. तो आषाढातही बरसणार आहे.
गुरुवारपासून (दि. 26) आषाढ मास सुरू होत आहे. 30 जूनपर्यंत शहरात हलका पाऊस राहील. मात्र, हवेचा दाब 5 जुलैपासून अनुकूल होत आहेत. त्यामुळे 5 ते 24 जुलै असा सुमारे वीस दिवस या मराठी मासात चांगला पाऊस राहील. जुलैचे शहराचे पर्जन्यमान हे 240 ते 260 मिलिमीटर इतके आहे. यंदा हा पाऊस 300 ते 350 मि.मी. पेक्षा जास्त होऊ शकतो, असाही अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
पुराण काळातील पर्जन्यमानाचे अभ्यासक ‘वराह मिहिर’ यांच्या ग्रंथातील नोंदीवर आधारित तयार केलेल्या मॉडेलनुसार जो अंदाज आम्ही दिला आहे, त्याप्रमाणे सर्वंच मराठी मास आणि नक्षत्रांत शहर आणि जिल्ह्यात पाऊस चांगला आहे. प्रामुख्याने राज्यात पुणे जिल्हा आणि कोकण विभागात अतिवृष्टी होईल.- राघवेंद्र गायकैवारी, वराह मिहिर मॉडेलचे अभ्यासक, पुणे
वैशाख कृ.5 (दि.17 मे) ते ज्येष्ठ शु. 1 (दि.27 मे)ः 270 मि.मी ज्येष्ठ शु 2 (दि.28 मे) ते ज्येष्ठ कृष्ण 14 (24 जून)ः 260.7 मी.मी (वैशाख आणि ज्येष्ठ मिळून एकूण पाऊसः 530 मि.मी)