पुणे : मध्यवर्ती ठिकाण, सोयी-सुविधांनी सुसज्ज अन् कलाकारांसह रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेले बालगंधर्व रंगमंदिर हे महापालिकेच्या 14 नाट्यगृहांपैकी सर्वाधिक कमाई करणारे नाट्यगृह ठरले आहे. नाट्यप्रयोगांसह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कला संस्थांची, कलाकारांची बालगंधर्व रंगमंदिरालाच अधिक पसंती असते. त्यामुळे महापालिकेने नव्याने सुरू केलेल्या ’रंगयात्रा अॅप’द्वारेही बालगंधर्व रंगमंदिराच्या तारखा मिळवण्यासाठी मोठी वेटिंग लिस्ट लागल्याचे दिसून येते. परिणामी, मागील वर्षभरात म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2025 या आर्थिक वर्षांत या रंगमंदिरांद्वारे 87 लाख 12 हजार 566 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अगदी मागील चार वर्षांची कमाईची आकडेवारी पाहिली, तर सर्वाधिक कमाई याच नाट्यगृहाने केली असल्याचे दिसून आले आहे.
संगीत रंगभूमीवरचे नटसम—ाट नारायण राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या नावाने हे नाट्यगृह उभारण्यात आले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले. दि. 26 जून 1968 रोजी नाट्यगृहाचे उद्घाटन झाले अन् नाट्यगृह नाट्यप्रयोगांसह कार्यक्रमांसाठी खुले झाले आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नाट्यगृहाला इतक्या वर्षांनंतरही विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आयोजकांकडून, कलाकारांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. ही वास्तू आमच्यासाठी कलाभूमी, कर्मभूमी असल्याचे कलाकार अभिमानाने सांगतात. गुरुवारी (दि. 26) बालगंधर्व रंगमंदिराचा 57 वा वर्धापनदिन साजरा होत असून, त्यानिमित्ताने दै. पुढारीने घेतलेला हा आढावा.
रंगमंदिराविषयी बोलताना नाट्यव्यवस्थापक मोहन कुलकर्णी म्हणाले, मी बालगंधर्व रंगमंदिराचा प्रवास जवळून पाहिला आहे. पूर्वीही नाट्यगृहात कार्यक्रम करण्यासाठी उदंड प्रतिसाद होता आणि आजही तितकाच प्रतिसाद आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यातील वैभव असून, आम्हा कलाकारांसाठी हे फक्त नाट्यगृह नाही तर कर्मभूमी आहे. मध्यवर्ती ठिकाण, सोयीसुविधांनी परिपूर्ण असल्यामुळे येथे नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी प्रत्येकाचीच पसंती असते. त्यामुळे आजही येथील तारखा मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादी असते. बालगंधर्व रंगमंदिरासारखे नाट्यगृह आपल्याकडे आहे, याचा अभिमान वाटतो.
सर्वाधिक नाट्यप्रयोग होणारे नाट्यगृह...
बालंगधर्व रंगमंदिरात होणार्या नाट्यप्रयोगांची संख्याही मोठी आहे. मुंबई, पुण्यातील नाट्य संस्थांसह राज्यभरातील संस्थांची पुण्यात नाट्यप्रयोग करण्यासाठीची पहिली पसंती या नाट्यगृहालाच असते. पालिकेने नुकत्याच सुरू केलेल्या ’रंगयात्रा अॅप’द्वारे नाट्यगृहाच्या तारखा मिळवण्यासाठी अर्ज करण्याची संख्याही मोठी आहे.
बालगंधर्व रंगमंदिर - 87 लाख 12 हजार 566
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड - 77 लाख 83 हजार 656
श्री गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट - 66 लाख 88 हजार 583
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी - 31 लाख 23 हजार 974
पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, औंध - 28 लाख 47 हजार 567
महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी - 27 लाख 77 हजार 336
विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह, हडपसर - 20 लाख 28 हजार 636
पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन आणि राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी (घोले रस्ता) - 20 लाख 25 हजार 937