पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा आज मंगळवारपासून (दि.24) सुरू होणार आहे. त्यासाठी दहावीच्या 34 हजार 562 तर बारावीच्या 68 हजार 98 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर होत असल्याचे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी स्पष्ट केले आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी, श्रेणीसुधार करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक या नऊ विभागीय मंडळांमार्फत 24 जून ते 16 जुलै या कालावधीत पुरवणी परीक्षा आयोजित केली आहे. (Latest Pune News)
दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 34 हजार 562 विद्यार्थ्यांमध्ये 24 हजार 245 मुले, 10 हजार 316 मुली, तर एका तृतीयपंथी विद्यार्थ्याचा समावेश आहे. तसेच बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 68 हजार 98 विद्यार्थ्यांपैकी 45 हजार 144 मुले, 22 हजार 953 मुली, एक तृतीयपंथी विद्यार्थी आहे.
परीक्षेसाठी राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. सकाळच्या सत्रात 10.30 वाजता, तर दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षा कक्षात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात सकाळी 11 वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता उत्तरपत्रिकांचे वितरण करण्यात येईल. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत. पुरवणी परीक्षेसाठी प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.