पुणे

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट उद्यापासून

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार्‍या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे हॉलतिकीट बुधवारी (दि.5) सकाळी 11 वाजल्यापासून संस्थेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. ओक यांनी दिलेल्या निर्देशानुसार, जुलै-ऑगस्ट 2023 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावी-बारावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.

प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकाचा, प्राचार्यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील, तर त्यांच्या दुरुस्त्या विभागीय मंडळात समक्ष जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.

प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यायचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी, असे स्पष्ट केले आहे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT