पुणे विभागात एसटीच्या 107 फेर्‍या रद्द; प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ file photo
पुणे

Pune ST: पुणे विभागात एसटीच्या 107 फेर्‍या रद्द; प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ

कोरोना काळातील रेड सिग्नल हिरवा झालाच नाही

प्रसाद जगताप

पुणे: कोरोना महामारीनंतर एसटी पुणे विभागाच्या सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. प्रवाशांचा घटलेला प्रतिसाद आणि बसच्या कमी झालेल्या संख्येमुळे पुणे विभागात तब्बल 107 बस फेर्‍या रद्द केल्या आहेत. याचा थेट परिणाम रोजच्या प्रवास करणार्‍या सरासरी एक लाख 60 हजार प्रवाशांवर होत असून, त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सध्या पुणे विभागात एसटीच्या एकूण 3400 फेर्‍या होतात. मात्र, कोरोनानंतर प्रवाशांची संख्या घटल्याने आणि उपलब्ध बसची संख्या कमी झाल्याने 107 नियोजित फेर्‍या रद्द कराव्या लागल्या आहेत. एसटी पुणे विभागाच्या ताफ्यात सध्या साडेआठशे बस असून, एकूण 14 आगार आहेत. (Latest Pune News)

विभागाचे रोजचे उत्पन्न विनासवलती सव्वाकोटीपर्यंत तर सवलतींसह दोन कोटीपर्यंत आहे. वेळेत बस न उपलब्ध होणे, बससाठी तासनतास थांबणे, बसायला जागा न मिळणे, गर्दी झालेल्या बसमधून प्रवास करणे यासह धोकादायकरीत्या वडापमधून प्रवास करणे,असा परिणाम प्रवाशांवर दिसू लागला आहे.

...या मार्गांवर सर्वाधिक परिणाम

मध्यम पल्ल्याचे मार्ग : शिवाजीनगर- शिर्डी,

भोर- पंढरपूर, भोर- मुंबई, भोर- परेल, भोर- ठाणे, भोर- बोरवली, रा. नगर- भीमाशंकर कुर्ला, रा. नगर- नाशिक, इंदापूर- सातारा, इंदापूर- कराड, इंदापूर- तारकपूर, इंदापूर- सांगली, पिंपरी- चिंचवड- नाशिक, पिंपरी-चिंचवड- गोंदवले, पिंपरी-चिंचवड- केळशी, पिंपरी-चिंचवड- बोरवली, पिंपरी-चिंचवड- पंढरपूर, एमआयडीसी- इचलकरंजी, एमआयडीसी- मोहटादेवी, एमआयडीसी- कोल्हापूर, एमआयडीसी- बीड या मार्गावरील काही फेर्‍या रद्द झाल्या आहेत.

विनावाहक बस मार्ग :-शिवाजीनगर- ठाणे,

स्वारगेट- ठाणे, भोर- स्वारगेट, नारायणगाव- जुन्नर, बारामती- स्वारगेट, एमआयडीसी- स्वारगेट या मार्गावरील काही फेर्‍या रद्द झाल्या आहेत.

लांब पल्ल्याचा मार्ग : तळेगाव- तुळजापूर या मार्गावरील फेर्‍या रद्द झाल्या आहेत.

शटल सेवा मार्ग : शिवाजीनगर- भीमाशंकर, भोर- स्वारगेट, भोर- महुडे, भोर- निरा, नारायणगाव- खोडद, नारायणगाव- ओझर, नारायणगाव- ओतूर, नारायणगाव- जुन्नर, नारायणगाव- घोडेगाव, राजगुरुनगर- पाबळ, राजगुरुनगर- चाकण- शिक्रापूर, बारामती- निरा, बारामती- एमआयडीसी, बारामती- जेजुरी, बारामती- वालचंदनगर, इंदापूर- बारामती, इंदापूर- अकलूज, सासवड- सुपा, दौंड- बारामती, दौंड- चौफुला या मार्गावरील काही फेर्‍या रद्द झाल्या आहेत.

कोरोनानंतर म्हणजेच 2019 नंतर विभागातील एसटीच्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आणि बसची संख्याही कमी झाली होती. त्यामुळे आम्हाला काही मार्गांवरील बस फेर्‍या रद्द कराव्या लागल्या आहेत. एकूण 107 बस फेर्‍या सध्या बंद आहेत, ज्या पूर्वी सुरू होत्या. परंतु, शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सवलतीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
- कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग
मी पुण्याहून मुंबईला अनेकदा एसटीने प्रवास करतो. आम्हाला अनेकदा सकाळी आणि संध्याकाळी बस मिळायला खूप वेळ लागतो. त्यामुळे कामे वेळेत होत नाहीत, एसटीने याबाबत लवकर तोडगा काढावा.
- श्रेयस शेडगे, प्रवासी
एसटी ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. भोर- स्वारगेट मार्गावरील फेर्‍या कमी झाल्यामुळे आमच्यासारख्या चाकरमान्यांसह महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. काही वेळा तर बसच मिळत नाही आणि मग पर्यायी व्यवस्था करावी लागते, त्यासाठी जास्त खर्च येतो.
- किरण गायकवाड, प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT